गेल्या काही दिवसा अगोदर ओडिशा राज्यातील बालासोर या ठिकाणी भीषण असा रेल्वे अपघात होऊन तब्बल 280 प्रवाशांना जीव गमावावा लागला होता. या अपघातानंतर रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जर लांबचा प्रवास करत असताना जर असा काही अपघात झाला तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कुटुंब उघड्यावर पडण्याची भीती असते.
त्यामुळे अशा मूर्त व्यक्तीच्या कुटुंबांना सरकारकडून मदतीचा हात दिला जातोच परंतु रेल्वेचे तिकीट जेव्हा ऑनलाईन बुक केले जाते तेव्हा आय आर सी टी सी च्या माध्यमातून प्रवाशांना विमा देखील प्रदान केला जातो. या विमा अंतर्गत दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची तरतूद आहे.
कशा पद्धतीने मिळेल हे विमा संरक्षण?
बरेच व्यक्ती खूप दूरवरचा प्रवास असेल तर रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. रेल्वेच्या माध्यमातून प्रवास केला तर अनेक प्रकारचे सोयीसुविधा आणि फायदे देखील दिले जातात. आता आपल्यापैकी बरेच जण तिकीट काउंटरवर तिकीट न घेता ऑनलाइन पद्धतीने तिकट बुक करण्याला प्राधान्य देतात.
ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करताना तुम्हाला तुमच्या सीटची निवड करण्यापासून तर प्रवास करत असताना खाण्यापिण्याच्या पर्याय देखील दिलेला असतो. जेव्हा तिकीट बुक केले जाते तेव्हाच विमा घेण्याचा पर्याय देखील या ठिकाणी तुम्हाला दिला जातो. या माध्यमातून प्रवास करत असताना जर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर याप्रसंगी झालेल्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान देखील या माध्यमातून कव्हर करण्यात येते.
आय आर सी टी सी च्या माध्यमातून केवळ 35 पैशांच्या प्रीमियमवर ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल दहा लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. हा पर्याय प्रवासासाठी ऐच्छिक आहे. परंतु प्रवाशाकरिता हा सर्वात स्वस्त आणि उत्तम असा विमा संरक्षण पर्याय आहे.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करताना जेव्हा पेमेंट प्रोसेस केली जाते त्यामध्ये प्रवास विम्याचा हा पर्याय मिळतो. जर तुम्ही तो निवडला तर तुम्हाला 35 पैशांमध्ये हे विमा संरक्षण मिळते. जर तिकीट एका पीएनआर द्वारे सर्व प्रवाशांचे बुक केले असेल तर सर्व प्रवाशांना हे संरक्षण लागू होते.
केव्हा मिळते विमा संरक्षण? या अंतर्गत जे काही विमा संरक्षण दिले जाते ते कायमचे अंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व तसेच दुखापत किंवा गंभीर दुखापतीमुळे जर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर वाहतूक खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यू इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होतो.
रेल्वेने प्रवास करत असताना जर प्रवासादरम्यान अपघात झाला व प्रवासी जखमी झाले व दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते. कायमस्वरूपी अंशिक अपंगत्व आले तर साडेसात लाख रुपये संरक्षण देण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. दुर्दैवाने जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या पार्थिवाच्या वाहतुकीसाठी दहा हजार रुपये आणि मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व आले तर दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण या माध्यमातून मिळते.
Share your comments