"फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स" ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शिवकृपा दूध संकलन शितकरण केंद्र, खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर मधील दोघाजणांवर, बारामती पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील शिक्षा पात्र कलम ५९ चे उल्लंघन केले असल्याने गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. व त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ८ जुलै २०२१ रोजी ह्या केंद्रातून बारामती कडे जाणाऱ्या टँकर मधील गाईचे दूध कमी दर्जाचे व भेसळयुक्त आढळल्यामुळे ८४९७ हजार लिटर नष्ट केले. अशी छोटी बातमी वाचण्यात आली होती. म्हणून आम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये, १९ जुलै 2021 ला अर्ज करून दुधाचा विश्लेषण अहवाल (Test Report) व दूध जप्ती व्यतिरिक्त त्या संकलन केंद्रावर काय कारवाई केली त्याचा तपशील मागितला होता. ह्यामध्ये आमचे मित्र नंदकुमार रोकडे ह्यांनी पण सहकार्य केले. अन्न व औषध प्रशासनाचे एक महिन्यानंतर मोघम उत्तर आले व समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे आम्ही २० ऑगस्टला प्रथम अपील केले.
त्यानंतर त्यांनी आम्हाला २१ सप्टेंबरला सुनावणी साठी बोलावले. त्यावेळी आमचे मित्र राहुल माने व दिलीप कापरे ही सोबत होते. आम्ही आमच्या मागण्याबद्दलची गंभीरता सांगितली. व पूर्ण माहिती मिळेपर्यंत पाठपुरावा करणारच आहोत हे सांगितले. हे उदाहरण म्हणजे हिमनगाचे एक छोटे टोक आहे व शिक्षा झाल्यास बाकीच्यांना जरब बसेल अशी भूमिका मांडली. त्यानंतर बातमी वाचण्यात आली की गाय दुधाच्या विश्लेषण अहवाला नुसार त्यामध्ये डिर्टजंट व ग्लुकोजची भेसळ आढळून आली आहे. व संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. हे आमच्या प्रयत्नांचे यश आहे. त्याच बरोबर अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई सरांचे विशेष आभार मानावे लागतील जे समाज संवेदनशील कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
'महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संघाने' असा इशारा दिला होता की ५० लाख लिटर दूध भेसळीची चर्चा कपोलकल्पित असून अकारण घडवून आणली जात आहे व डेअरी उद्योगाला धोकादायक आहे. पण नेहमी प्रमाणे हा त्यांचा अपप्रचार आहे.
कित्येक ठिकाणी धाडी मध्ये भेसळीचे दुध सापडत आहेत. त्यांना राजकीय संरक्षण मिळत आहे. पुढील कडक कारवाई होणे जरूरी आहे.नुकतेच अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरातील जांभळे रोड येथील दूध संकलन केंद्रावर छापे टाकून ८० हजार ६७० रुपयांचे भेसळयुक्त दूध व साहित्य जप्त करण्यात आले.
वालचंदनगर येथील खाडे वस्ती पो. लाकडी ता. इंदापूर तेथील धाडीत गाईच्या दुधात व्हे पावडर व लिक्विड पॅराफीन ही रसायने मिसळल्याचे आढल्यामुळे दूध नष्ट करण्यात आले. आॕगस्ट मध्ये मथुरेला डिटर्जंट पावडर आणि घातक केमिकलचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या नकली दुधाच्या रॅकेटचा पोलिसांनी 7 जणांना अटक करून 10 हजार लिटर विषारी, सिंथेटिक दुधाचा टँकरही जप्त केला आहे.
राहुरी तालुक्यातल्या चंडकापूर ,पोस्ट- केंदळ, ता. राहुरी येथे गाईच्या दुधात “लाईट लिक्विड पॅराफीन हे पावर ॲाईल व व्हे पावडर" असे भेसळ पदार्थ सापडल्यामुळे कारवाई करण्यात आली.
अशी अनेक उदाहरणे आहेत.
Share your comments