1. इतर बातम्या

त्या काळातही अश्या प्रकारे शिवाजी महाराजांनी दिले होते शेतकऱ्यांना अभय

“शेतकरी सुखी,रयत सुखी तर राजा सुखी” हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते.स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आज ह्या महापुरूषाची जयंती संबंध मराठी मुलुखात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कृषी धोरणाचे घेतलेले दर्शन ….

KJ Maharashtra
KJ Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.महाराज जमतेम ५० वर्षे जगले.

छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.महाराज जमतेम ५० वर्षे जगले.

छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.महाराज जमतेम ५० वर्षे जगले.त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता.

 

भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो.सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती.

 

शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. “शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी’ हे सूत्र महाराजांना समजले होते.त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता.

 

महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम अभंगात म्हणतात, “मढे झाकूनिया करती पेरणी” त्या काळात शेतीला किती महत्त्व होते,हे लक्षात येते. रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे,अशी पध्दत होत.(आज शेतकऱ्यांनाच स्वतःच मढे होण्याची वेळ आलीय,असो.)

 

पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत.त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे.कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

 

प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण एके ठिकाणी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली .

प्रथम सन १६३९ मध्ये दादोजी कोंडदेवाच्या वेळी नतंर १६४९ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्याभिषेका नंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी १६७८ मध्ये स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले.

बिघा,पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत.तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले,यालाच ‘पीक पाहणी’ असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे.ब्रिटिश शासनाने या पध्दतीची नक्कल केलेली आहे.

 

शिवरायांनी प्रत्येक जमिनीचा प्रतवारीनुसार शेतसारा म्हणजे महसूल आकारला जात असे. स्वराज्यात शेतसारा दोन प्रकारे स्वीकारला जात असे. एक नख्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरुपात. बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरुपात स्वीकारला जात असे. शिवाजी महाराजांचे सारा वसूल करणार्‍या अधिकार्‍यास कुलकर्ण्यास म्हणजे आजच्या तलाठ्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश असत.

 

छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला ५ सप्टेंबर १६७६ ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात ,” इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे.

 

रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे ” याच पत्रात ते पुढे म्हणतात,”ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल,नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे.त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी

 

छत्रपतींच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात. म्हणूनच संत रामदास स्वामी यांना शिवरायांच्या रूपाने ‘जाणता राजा’ दिसतो तर संत तुकाराम महाराज यांना शेतकऱ्यांचा कल्याण करणारा लोककल्याणकारी राजा नजरेस पडतो. महात्मा फुले यांना कुळवाडी भूषण दिसतो.

 

प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण यांनी आज्ञापत्रातील एक आणखी एक दाखला दिला आहे,तो दाखला असा:-

‘दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस,अन्यथा उंदिर दिव्यातील पेटती ज्योत पळवतील.कडब्याच्या गंजी पेट घेतील.गुरा-ढोरांना चारा मिळणार नाही.गुरे-ढोरे दूध देणार नाहीत.माझ्या रयतेची बालके दुधापासून वंचित राहतील.माझा भावी महाराष्ट्र दुबळा होईल.तरी दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस’. यावरून शिवरायांची प्रजेबद्दलची काळजी पालकासारखी असल्याचे स्पष्ट होते.

 

आपल्या राज्यातली रयत सुखी असेल तरच राजाही सुखी असेल,असा शिवरायांच्या राज्य कारभाराचा दस्तूर होता. कोणत्याही परिस्थितीत लष्कराने किंवा महसुली अधिकार्‍यांनी शेतकर्‍याकडून धान्य,भाजीपाला फुकट घेऊ नये,असे त्यांचे सक्त आदेश होते.गोव्यातल्या बारदेश भागातून स्वस्त मिठाची आयात सुरू झाल्यामुळे, कोकणातल्या मिठागारावर परिणाम व्हायला लागला. तेव्हा शिवरायांनी गोव्यातल्या मिठावर जबर कर बसवा आणि स्वराज्यापेक्षा ते महाग होईल,असे पहा,असा आदेश देतानाच,मिठाचा मामला लाख मोलाचा,असे लिहिले आहे.

 

कोकणपट्टी स्वराज्यात आल्यावर आदिलशहाच्या सनदेनुसार चिंचवडच्या मोरया गोसावी संस्थानाचे लोक कोकणात भाताची स्वस्त खरेदी करण्यासाठी गेले,तेव्हा स्वराज्याच्या अधिकार्‍यांनी त्यांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीत भाताच्या खरेदीला मनाई केली.हे प्रकरण शिवरायांच्यापर्यंत गेले.तेव्हा त्यांनी चिंचवडच्या संस्थानाला राज्याच्या कोठारातून उत्सवासाठी धान्य देणगीदाखल द्यावे, असे आदेश दिले.पण, रयतेच्या हिताचे रक्षण केले. केवळ स्वराज्यातल्याच नव्हे, तर शिवरायांचे लष्कर स्वार्‍यांवर शत्रूंच्या प्रदेशातून जात असताना,तिथल्या रयतेलाही त्रास देवू नये असा त्यांचा दंडक होता.पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी रयतेची काळजी घेतली त्यामुळेच ते सर्वार्थाने रयतेचे राजे झाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक विचार लक्ष विचारात घेण्याबरोबरच राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा वेध घेणे आवश्यक आहे. महाराजांनी राज्यभिषेकासाठी ६ जुन ही तारीखच का निवडली ? ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस.कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस.देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही.महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात. म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात बळीराजाच्या सोयीचे जावे व त्याचा एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणून त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणून ६ जून हा दिवस निवडला गेला. त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांना पण सोयीचे होते,याला म्हणतात दूरदृष्टीपणा,यालाच म्हणतात महापुरुष.

 

महाराजांच्या काळात सेंद्रीय शेती केली जात असे आज ती रासायनिक खतांच्या प्रभावाखाली आली आहे.त्याकाळात शेतकरी आत्महत्या होत नसत,आज शेतकरी आत्महत्येचा विषय गहन झाला आहे.जगात कापौरेट शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काही कंपन्यांनी भारतातील शेती गिळंकृत करण्यात डाव साधला आहे. जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना आपलं मूत्र प्राशन करण्याची वेळ आली. वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यास योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याची पाळी आली.

 

एकूणच आजचे शेतीचे अर्थकारण बिघडलेले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. ही कर्जमाफी तत्कालीन काळासाठी आधार देणारी असली तरी ‘शाश्वत’ पर्याय असू शकत नाही. त्यामुळे ही दरी संपुष्टात आणण्यासाठी विदर्भ मराठवाड्यात सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. शेती मालास योग्य भाव मिळाला पाहिजे, पशुधन वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला शेतकरी सुखी होईल.

 

जैवीक शेतकरी 

 शरद केशवराव बोंडे ९४०४०७५६२८

प्रतिनिधी - गोपाल उगले

PM

English Summary: On that time of chatrapati Shivaji maharaj they advice for farmer Published on: 04 September 2021, 09:04 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters