अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुले ही शिक्षण पुर्ण करून खासगी कंपनीत नोकरी करत आहेत. परंतु सध्या देशात कोरोनामुले लॉकडाऊन करण्यात आल्याने उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे कंपन्यांचे उत्पन्न होत नसल्याने अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारीवर कुऱ्हाड चालवत आहेत. काही कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा भीती वाटत आहे. दरम्यान अशा युवकांना घाबरण्याची गरज नाही.
जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता सतावत असेल तरी काळजी करू नका. तुम्हाला ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेता लाभ घेता येईल. जर तुमची कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ किंवा ईएसची रक्कम कापत असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला २४ महिन्यांकरिता सरकारकडून पैसे मिळत राहणार आहेत. याविषयीचे वृत्त लोकसत्ता या वृत्तसंस्थेने दिले आहे.
‘कर्मचारी राज्य विमा महामंडळा’च्या (ईएसआयसी) ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास सरकार त्याला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे. बेरोजगार व्यक्तीच्या गेल्या ९० दिवसांच्या २५ टक्के इतकी रक्कम त्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे. जे लोक ईएसआयसीशी जोडले गेले आणि ज्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी केली आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याव्यरिक्त आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटही डेटाबेसशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
कशी कराल नोंदणी?
‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकचा वापर करा. हा फॉर्म भरल्यानंतर तो नजीकच्या ईएसआयसी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. तसेच यासोबत २० रूपयाचा नॉन ज्युडिशिअल स्टँप पेपरवर नोटरीद्वारे अॅफिडेव्हिट द्यावे लागणार आहे. यामध्ये AB-1 पासून AB-4 पर्यंत फॉर्म जमा करून घेतला जाईल. सध्या यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कामामुळे कंपनीतून काढून टाकले असेल, तसेच एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Share your comments