देशातील वीज संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली. याअंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपांचा वापर घटवण्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत, यासह सिंचन झाल्यानंतर शिल्लक असलेल्या विजेपासून शेतकरी पैसा कमावू शकतील.
कुसुम योजना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प २०१८ -१९ मध्ये जाहीर केली होती. २०२०-२०२१ च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्पांतर्गत २० लाख सौरपंपांना अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे डिझेल वापर आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर आळा बसेल. केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होईल. एक, त्यांना सिंचनासाठी विनामुल्य वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी अतिरिक्त वीज बनवून ग्रीडला पाठविली तर त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल. याशिवाय सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ १0% रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका 30 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. त्याच वेळी, सरकार सौर पंपच्या एकूण खर्चाच्या ६0% शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देईल.
हेही वाचा:पीएम किसानच्या लाभार्थींसाठी केसीसी बनवणे आहे सोपे; बँक देत असेल त्रास तर करू शकता तक्रार
कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
१) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा
३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता कुसुम सौर योजनेंतर्गत भरलेला फॉर्म जमा करा.
कुसुम योजनेची महत्त्वाची माहिती
राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी (अश्वशक्ती) तर पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमी असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपी कृषी पंप देण्यात येणार. पाच एचपी कृषीपंपाची किंमत तीन लाख ८५ हजार आहे. तर, तीन एचपी कृषीपंपाची किंमत दोन लाख ५५ हजार रुपये आहे. हे पंप घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या या किंमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचित जाती व अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. महावितरण कार्यालयातर्फे पुढील पाच वर्षांसाठी कृषी पंपाची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, ८० टक्के अनुदानासह मिळेल दमदार नफा
औरंगाबाद विभागात सध्या ५०० आणि जालना विभागात एक हजार कृषी पंप पेंडिंग असून या योजनेतंर्गत मार्च २०१८ नंतरच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना www.mahadiscom.in/solar या संकेतस्थळावर अर्ज भरावा लागणार आहे.
Share your comments