Big News: औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं अंदाजे 700 जणांची प्रकृती बिघडली. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली.
लग्नसमारंभ सुरु असतानाच जेवणानंतर लोकांना त्रास सुरु झाला. अचानक मोठ्याप्रमाणावर ही संख्या वाढू लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. त्यामुळे या सर्वांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात देखील अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.
पाहता-पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 700 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Share your comments