1. बातम्या

कृषी विधेयकाला शेतकऱ्यांचा विरोध का? – शरद पवार सांगितलं कारण

देशातील पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. राज्यात हे कायदे लागू करण्यासंबंधित अजून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान शेतकरी या कायद्यांविरोधात का आंदोलन करत आहेत याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. तुळजापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्यांना भीती वाटतेय की शेतकऱ्यांसाठी बाजार खुला केला, पाहिजे तिथं माल विका ठीक आहे, पण जर माल विकला गेला नाही तर मालाला किमान किंमत मिळेल की नाही? आत्तापर्यंत असे होते की, मंत्रिमंडळ शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत ठरवते व शेतकऱ्याला पैसे मिळतात. परंतु नव्या विधेयकात ही तरतूद नाही ही शेतकऱ्यांची मुख्य तक्रार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भीती वाटतेय की या नव्या विधेयकामुळे अमेझॉन, रिलायन्स यासारख्या देशातील व जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपन्या शेतकऱ्यांकडून आज माल घेतील, स्थानिक स्पर्धा संपवतील आणि नंतर या कंपन्या म्हणतील त्या किमतीला माल विकायला भाग पाडतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे पवार म्हणाले.
मनमोहन सिंगांचे सरकार होते व उदारीकरणाचे निर्णय घेण्यात येत होते. त्यावेळी भाजपाने छोटे दुकानदार एकत्र करून मोठे आंदोलन केले. तसेच आंदोलन आता शेतकरी करत आहेत. आता केंद्र सरकार म्हणत आहे की, किमान आधारभूत किंमत देऊ. पंजाब हरयाणामधील शेतकऱ्यांनी सांगितले ठीक आहे, मग ते विधेयकात घाला. शेतकऱ्यांना भीती आहे की किमान आधारभूत किंमत मिळणार नाही म्हणून त्यांचा कृषिविधेयकाला विरोध आहे.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेतले व ते गोळा केले परंतु ते सगळे वाहून गेले. अतिवृष्टीमुळे जमिनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा” असे शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पाठराखण…

ज्यावेळी अशा प्रकारचं मोठं संकट येतं तेव्हा महत्त्वाच्या व्यक्तिंनी मुंबईत एका ठिकाणी बसून नियोजन करणं आवश्यक असतं. प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून काय उपाय योजना करावी लागेल याचा आढावा घ्यायला लागतो. आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या टिकेचा समाचार शरद पवारांनी घेतला व मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters