गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची निसर्गाच्या लहरीपणाशी अहोरात्र झुंज सुरु आहे, द्राक्ष बागायतदार देखील यापासून वाचलेले नाहीत. या हंगामात तर सुरवातीपासून निसर्गाचे विक्राळ रुप बघायला मिळाले आहे. कधी अवकाळी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण या नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट होणार हे ठरलेलंचं होतं मात्र, असं असले तरी उत्पादनात जर घट झाली तर विक्रमी बाजारभाव मिळेल अशी भोळीभाबडी आशा बाळगून बागायतदार द्राक्षाची बाग जोपसण्यासाठी लाखों रुपयाचा खर्च करत राहिला.
महागडी फवारणी करत बागायतदाराने द्राक्षेच्या बागा वाचवण्यासाठी शर्तीची झुंज देणे चालूच ठेवले. मात्र, द्राक्ष बागा वाचवण्यासाठी केलेल्या फवारणीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील द्राक्ष बागा वाचण्याऐवजी अक्षरशः करपून गेल्या. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि तळणी शिवारात क्लोरपारिफॉस रासायनिक औषध असलेले कीटकनाशक फवारल्याने द्राक्ष बागा करपण्याची घटना समोर आली आहे. या शिवारातील जवळपास पंचवीस एकर क्षेत्रावर असलेली द्राक्ष बाग यामुळे पूर्णता क्षतीग्रस्त झाली आहे. या औषधाची फवारणी केल्यामुळे द्राक्ष वेली जळल्या असून घड सुकले आहेत काही ठिकाणी तर द्राक्षाची काडी देखील तडकल्या आहेत. याबाबत राज्याचे कृषिमंत्री यांच्याकडे तक्रार केली गेली आहे आता या प्रकरणावर कृषी विभागाकडून काय तोडगा काढला जातो हे विशेष बघण्यासारखे राहील.
या शिवारात अनेक द्राक्ष बागायतदारांच्या बागा आगामी काही दिवसात काढणीसाठी तयार होणार होत्या तसेच काही बागा जोमाने बहरत होत्या. द्राक्ष बागायतदारांनी अंतिम टप्प्यात असलेल्या या द्राक्ष बागातील द्राक्षमणी चांगले विकसित व्हावे या हेतूने या औषधाची फवारणी केली होती. मात्र, यामुळे द्राक्ष मणी विकसित होणे ऐवजी सुकू लागले आहेत. यामुळे या औषधाची फवारणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत द्राक्ष उत्पादक संघाने कृषी मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे. द्राक्ष उत्पादक संघाने संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली असून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.
या प्रकरणात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित द्राक्ष बागायतदारांच्या बागांची पाहणी केली आहे, तसेच फवारलेले औषध तपासणीसाठी प्रयोगशाळेत देखील पाठवले गेले आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीवर कारवाई होते की नाही तसेच संबंधित द्राक्ष बागायतदारांना नुकसानभरपाई मिळते की नाही हे विशेष बघण्यासारख राहील.
हेही वाचा:-
'या' जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाली खत टंचाई; रासायनिक खते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
Share your comments