देशात (Indian Weather) सध्या असानी चक्रीवादळ (Hurricane Asani) विषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. हे चक्रीवादळ शनिवारी तयार झाले आणि दोन दिवसानंतर चक्रीवादळाने वेग धरला आहे. आता चक्रीवादळाचा वेग वाढला असून उद्या अर्थात मंगळवारी हे चक्रीवादळ ओडीसा तसेच आंध्र प्रदेशच्या किनार्यावर धडकणार आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) माहिती दिली आहे.
सध्या असानी चक्रीवादळाचा वेग ताशी 90 किलोमीटर पर्यंत आहे. मात्र, येत्या काही तासात यामध्ये मोठी वाढ होणार असून चक्रीवादळाचा वेग 120 किलोमीटर प्रति तास एवढा पोहोचणार आहे. यामुळे चक्रीवादळाचे पडसाद देखील उमटणार आहेत. मात्र बुधवार नंतर म्हणजेच 11 तारखेनंतर चक्रीवादळाचा वेग मंदावणार आहे.
बुधवारी याचा वेग कमी होणार असून गुरुवारी याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असणार आहे. यामुळे हवामान विभागाने मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव केला आहे. निश्चितच चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कोणीही समुद्राकडे जाऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mansoon 2022: मान्सून लवकर येण्याच्या बातम्या फसव्या; हवामान तज्ञानेचं केला खुलासा
2022 चा पावसाचा अंदाज आला रे…..! 20 मे नंतर भारतात वरूणराजाच आगमन ठरलेलचं; उकाड्यापासून लवकरच आराम
यादरम्यान भारतीय हवामान खात्यानुसार, आगामी तीन दिवस संपूर्ण देशात उष्णतेची लाट बघायला मिळू शकते. वाळवंटी प्रदेश राजस्थान, दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र विशेषता विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यामुळे निश्चितच देशातील जनता उकाड्याने त्रस्त राहणार आहे. आपल्या राज्यातील विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात सूर्य देवता कोपणार असून हवामान विभागाने उष्णतेचा येलो ॲलर्ट विदर्भासाठी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास तरी विदर्भ वासियांना उकाड्यापासून आराम मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या असानी चक्रीवादळामुळे 10 मे रोजी आंध्रप्रदेश, ओडिसा, तर 11 मे रोजी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय आपल्या राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील (Maharashtra Weather) काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या अर्थात 10 मे ते 13 मे रोजी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या या दक्षिण कोकणातील जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस येणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने सांगितले आहे.
तर 13 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सोलापूर तर खानदेशातील धुळे आणि जळगाव याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे.
याशिवाय 11 ते 13 मे दरम्यान राजधानी मुंबई, मराठवाड्यात परभणी, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निश्चितच हवामान विभागाच्या या अंदाजामुळे राज्यातील काही जिल्ह्यात तूर्तास तरी उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळणार आहे.
Share your comments