1. बातम्या

विदर्भात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार


अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकणत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश मराठवाड्यात ढगाळ हवामान राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील विविध भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

त्याचे रुपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या दक्षिण भागापासून ते रायलसीमा दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. मॉन्सूनची आस असलेला पट्टा राजस्थानपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान मराठावाड्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. 

पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदी - नाल्यांच्या पाणीपातळी घट झाली आहे. भात शेतीला पुरक पाऊस पडल्याने  शेतकऱ्यांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे.   गेल्या आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु मागील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे.  गेल्या  पंधरा ते वीस  दिवस मध्य महाराष्ट्रातील  सर्वच जिल्ह्यांमधील  विविध  भागांत चांगला  पाऊस झाला आहे.  सध्या  तूर, कापूस, बाजरी ही पिके  वाढीच्या अवस्थेत  आहेत. बाजरी पीक कणसाच्या अवस्थेत आहेत. अती पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  अनेक ठिकाणी भात पीक जोमात आहेत. पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, तसेच खानदेशातली सर्व जिलह्यांत आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत. 

नाशिक जिल्ह्यात पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत चांगल्या आहेत. मात्र पश्चिम  पट्ट्यात भात लागवी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत.  दरम्यान कसमादे पट्ट्यातील कळवण, सटाणा, तालुक्यातील काही भागांतील पिकांना  पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters