शेती मराठी बातम्या
राज्यात अवकाळीचं संकट, हळद भिजल्याने शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
1. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं न भरून निघणार नुकसान झालं आहे. नंदवड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची काही दृश्ये आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहेत. उमरी तालुक्यातील मौजे कार्ला येथील शेतकरी मोहनराव पाटील कार्लेकर यांच्या शेतातील हळद वाळवणी साठी शेतात ठेवण्यात आली होती मात्र अचानक आलेल्या या पावसामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
वर्षभर केलेले कष्ट मातीमोल होताना शेतकऱ्याला उभ्या डोळ्याने पाहावं लागलंय. ज्ञानेश्वर दारसेवाड यांनी शेतकऱ्याची ही परिस्थिती दाखवली आहे. तरी जिल्हा व तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा केला आरोप
2. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रत्नागिरी येथील बारसू येथे माती परीक्षण सुरू असतांना लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला आहे. तसेच उद्धव ठाकरे तेथील शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र बारसूत जात असलो तरी कोणाची हिम्मत बघायला जात नाहीये. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बारसू प्रकल्पावरून ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतांना तेव्हा केंद्रातून सांगण्यात आलं होतं की हा प्रकल्प चांगला आहे. मात्र, दबावाखाली याबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर
3. साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जगात महाराष्ट्र राज्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता आता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. तर २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १,०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
जिल्हाबंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; राजू शेट्टी यांचा इशारा
4. बारसूतील रिफायनरी प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील शेतकऱ्यांचे समर्थन केलं आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बारसूमध्ये जाणार होते. मात्र रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ३१ मे पर्यंत जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे. तर आदेश मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पाहुयात
आता किसान क्रेडिट कार्डवर घेता येईल गाई, म्हशींकरिता कर्ज
5. आता पशुपालकांसाठी एक महत्वाची बातमी
नाशिक जिल्ह्यात गाई, म्हैस खरेदी करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याकडे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे किसान क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवर गाई, म्हैस खरेदी तसेच कुक्कुटपालन यासाठी कर्ज घेता येणं शक्य आहे. या योजनेंतगर्त गाय, म्हैस, मेंढ्या, शेळी, कोंबडी यांच्या देखभालीसाठी तीन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
आता किसान क्रेडिट कार्ड? नक्की कसं काढायचं तर त्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा, जमिनीची माहिती, पिकाची माहिती आणि केवायसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट मिळते. ती प्रिंट बँकेत जमा करावी लागते.
अधिक बातम्या:
तुम्हालाही एका वर्षात 1 लाख रुपयांपर्यंत पेन्शन हवी असेल तर हे काम लवकर करा
दररोज 95 रुपये गुंतवा आणि 14 लाख रुपये मिळवा, योजना जाणून घ्या
भात शेतीसोबत मत्स्यपालन करा, चांगले उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळेल
Share your comments