१) संसदेचं आजपासून अधिवेशन, पंतप्रधान मोदी भावूक
आजपासून संसदेचं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. आज जुन्या संसद भवनामध्ये शेवटचं कामकाज पार पडलं आहे. ७५ वर्षांपासून विविध घटनांचे साक्षीदार असलेल्या या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या इमारतीतील आठवणींना उजाळा देखील दिला आहे.
२)'सरकार, कारखानदार संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेतंय'
राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून सहा महिने झालेत. तरीही गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा आर.एस.एफ सुत्रानुसार हिशोब पुर्ण न करता फायनल बिले निश्चीत करण्यात आलीत. यामुळे सरकार आणि कारखानदार संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेतंय, असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना न देण्याची मागणी देखील साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे राजू शेट्टी यांनी केली.
३)गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर राज्यात पावसाची शक्यता
उद्या मंगळवारी राज्यात गणरायाचं आगमन होतंय. या मुहूर्तावर राज्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. उद्या पुणे, मुंबई आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यभरात सर्वत्र मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
४) पावसाअभावी लिंबू उत्पादनात मोठी घट
राज्यात यंदा पावसाचा चांगलाच खंड पडला आहे. यामुळे खरीप पिकांचं नुकसान झालंय. तसंच लिंबू उत्पादक भागात देखील पावसाने पाठ फिरवल्याने लिंबू उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारातील आवक देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, आवकेत घट झाल्याने बाजारभावात चांगलीच वाढ झालीय. १५ किलोच्या लिंबू गोणीमागे महिनाभरात ८०० रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या एका गोणीला १ हजार पेक्षा अधिक दर मिळत आहे.
५) अपघातग्रस्तांना मंत्री सामंतांकडून मदत
रत्नागिरी येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या रत्नागिरी- महाड – वसई बसचा हातखंबा येथे अपघात झाल्याची घटना घडली. यावेळी तेथूनच राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत हे महाडच्या दौऱ्यावर जात होते. त्याच्या समोरच बसचा अपघात झाल्याचं समजताच त्यांनी कार थांबवत तात्काळ खाली उतरुन अपघातग्रस्तांना मदत केलीय. यावेळी त्यांनी स्वतःच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता मदतकार्य केलंय. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या २१ प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.
Share your comments