भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी या कृषीप्रधान देशाचा कणा आहे. शेतकरी बांधव आपल्या यशाने स्वतःचे व देशाचे कल्याण करीत असतात. देशातील अनेक शेतकरी कृषी क्षेत्रात मोठे नाव लौकिक कमवीत असतात, येवला तालुक्यात धनकवडी गावाचे रहिवासी शेतकरी साईनाथ व अनिल या दोघा भावांनी शेती क्षेत्रात चांगले यश संपादन केले. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते म्हणून जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा या नगदी पिकांची लागवड नजरेस पडते.
साईनाथ व अनिल या दोन्ही बंधूंनी देखील कांदा पिकाच्या लागवडीत मोठे यश प्राप्त केले. साईनाथ जाधव व त्यांचे बंधू अनिल जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 30 एकर शेतजमीन आहे. ते आपल्या शेतजमिनीत कांदा लागवड करतात. 2019-20 यावर्षी कांद्याला कधी नव्हे तो विक्रमी दर प्राप्त झाला होता, त्यामुळे या दोन्ही बंधूंना कांदा पिकातून लाखोंची कमाई झाली होती. कांदा पिकातून झालेल्या लाखोंच्या कमाई मुळे त्यांनी एक बंगला बांधण्याचा निर्णय घेतला, बंगल्याचे पूर्ण काम कांदा पिकातून प्राप्त झालेल्या पैशाने होत असल्याने त्यांनी कांद्याला याचे श्रेय देण्याचे ठरवले, त्या अनुषंगाने या दोन्ही बंधूंनी बंगल्यावर कांद्याची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी यासाठी अनेक ठिकाणी शोध तपास केला, व शेवटी लासलगाव येथे त्यांनी दीडशे किलोच्या कांद्याची प्रतिमा बनवली. तयार केलेली कांद्याची प्रतिमा त्यांनी चक्क आपल्या बंगल्यावर स्थित केली. त्यांचा हा नाविन्यपूर्ण निर्णय पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. साईनाथ व अनिल यांच्या मते, ज्या कांदा पिकाने त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः पालटली, संसाराची आर्थिक घडी विस्कटलेली असताना कांदा पिकातून प्राप्त झालेल्या पैशांनी संसाराची आर्थिक घडी पुन्हा पटरीवर आणण्याचे कार्य केले त्या कांदा पिकाला याचे श्रेय देणे अनिवार्य आहे.
म्हणून त्यांनी आपल्या बंगल्यावर दीडशे किलो कांद्याची प्रतिमा साकारली आहे. धनकवडी गावात व आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या या बंगल्याची विशेष चर्चा होताना नजरेस पडत आहे व या युवा शेतकऱ्यांच्या कल्पनेला सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेहमीच बिन भरवशाचे पीक म्हणून ओळखले जाणारे कांदा पिक या बंधूंसाठी विशेष लाभदायी सिद्ध झाले आहे एवढे नक्की.
Share your comments