देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने सरकारी तसेच गैरसरकारी तत्वावर कार्य करणाऱ्या अनेक कंपन्या दररोज वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असतात. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याने, देशातील अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक उपाय योजना कार्यान्वित करतात त्यामुळे शेतकऱ्यांचा तसेच अशा खासगी कंपन्यांचा मोठा फायदा होत असतो. अशीच एक भन्नाट योजना ॲग्री हाईक कंपनीने शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित केली आहे. या कंपनीने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बांधा वरूनच विक्री करता यावा म्हणून एका अप्लिकेशन ची निर्मिती केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी मोठी सुविधा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या ॲप्लीकेशन मुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेतातच विक्री करता येणार असून त्याद्वारे प्राप्त होणारा पैसा देखील शेतातच प्राप्त होणार आहे. ॲग्री हाईक स्टार्टअप कंपनी 2018 या यावर्षी देशात स्थापन करण्यात आली, ही कंपनी शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील महत्वाची माहिती प्रदान करते, शेतकऱ्यांना ही कंपनी आपल्या वेबसाईट द्वारे तसेच फोन द्वारे शेतीमधील बहुमुल्य माहिती देत असते.
ॲग्री हाईक ही कंपनी देशातील शेतकऱ्यांना बिग बाजार, बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश मार्ट यांसारख्या देशातील अग्रगण्य रिटेलर सोबत जोडून देते, यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल चांगल्या किमतीत विक्री करता येतो. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न प्राप्त होते.
दिवसेंदिवस देशात इंधन दरवाढीचा फटका शेतकर्यांना बसत आहे, इंधन दरवाढीमुळे शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणे शेतकऱ्यांना मोठे खर्चिक होत आहे, तसेच बाजारपेठेत देखील शेतमालाला चांगला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मोठे मुश्कील झाले आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणी ओळखून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या सुरजित पाटील यांनी आपल्या मित्रांसमवेत या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीत शेतकरी बांधवांना मोफत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना फळे भाजीपाला धान्य तसेच इतर शेतीची उत्पादने विकता येणार आहेत.
शेतकऱ्यांना येथे शेतमाल विक्री करताना शेतीमालाचा दर देखील ठरविता येणार आहे. शेतमाल खरेदी करणारे खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतमालाची खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना जागीच शेतमालाच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला ची माहिती खरेदीदारास या कंपनीद्वारे दिली जाते त्यानंतर खरेदीदार व शेतकऱ्यांची भेट होते आणि शेतमालाची विक्री घडवून आणली जाते. शेतमाल विक्री केल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे दिले जातात.
Share your comments