देशात कोरोनाचे संकट असताना बर्ड फ्लूचे संकट आले आहे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ राज्यात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात साधरण ५०० कावळे यामुळे मृत पावल्याचा निष्पन्न झाले आहे. अनेक राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पोल्ट्री फार्म चालक चिंतेत आले आहेत. शिवाय मांस आणि अंडे विक्री मंदावली आहे. पण तृर्तास कोंबड्यांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले नाही. दरम्यान इतर राज्यात बर्ड फ्लू आला असल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर महाराष्ट्रातील पोल्ट्री फार्म चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाकडून एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी निगेटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून, पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: मध्यप्रदेश , राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशात आला बर्ड फ्लू; अनेक राज्यात अलर्ट, अंडे विक्रीला बंदी
याबाबत बोलताना सुनिल केदार म्हणाले, पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे येथे पाच राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात.
सन २०२०-२१ मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण १ हजार ७१५ विष्ठा नमूने, १हजार ९१३ रक्तजल नमूने १ हजार ५४९ घशातील द्रवांच्या नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी निगेटिव्ह आढळून आले आहेत.
हेही वाचा :बर्ड फ्लूमुळे अस्वस्थ पोल्ट्री व्यावसायिक, दररोज कोट्यावधी अंडी आणि कोंबडीची उलाढाल
तसेच, स्थलांतरीत होणा-या जंगली पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणा-या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोबडयांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही.
अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही. स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन देखील केदार यांनी केले.
Share your comments