1. बातम्या

झेंडुचा भाव कडाडले; मिळतोय ३०० रुपये किलोचा दर


मुंबई : मध्यंतरी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फुल शेती करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. झेंडुचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर फिरवला होता. लॉकडाऊन उघडल्यानंतर बाजारातील आवक काहीशा प्रमाणात सुरू झाली असून झेंडुच्या फुलांनी आपला भाव वाढवला आहे.

गेल्या वर्षी १२० रुपये किलोपर्यंत स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून  ३०० रुपये किलो इतका झाला. बाजारात सध्या मागणी मर्यादीत असली तरी टाळेबंदीच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या झेंडूच्या बागा आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराच्या फटक्यामुळे मुंबई बाजारात येणाऱ्या झेंडूची आवकच ७० टक्कय़ांनी घटली आहे.

 

मुंबई आणि महानगर परिसरात झेंडूची आवक प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातून, तसेच सासवड-पुरंदर आणि जुन्नर या  परिसरातून होते. त्यासाठीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैच्या दरम्यान केली जाते. परंतु टाळेबंदीच्या काळात आणि शिथिलिकरणाच्या धरसोड भूमिकेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड केली नाही. त्यात सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातील नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या लागवडीला महापूराचा फटका बसला. ‘दरवर्षी सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातून सुमारे २० टन झेंडूची दिवसाला वाहतूक होते. दरम्यान सध्या ग्राहकांचे प्रमाण मर्यादीत असले तरी शुक्रवारी मागणी वाढू शकते, तसेच याचवेळी राज्यातील इतर ठिकाणचा तसेच कर्नाटकातील काही झेंडू बाजारात उतरला तर दर कमी होऊ शकतात. मात्र तोपर्यंत झेंडूचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुरवठा खुंटल्याने झेंडुच्या दरात वाढ

सर्वसाधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. पण त्याचवेळी मागणीदेखील वाढत असल्याने दर वाढतात. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी राज्यातील विविध भागांतून झेंडू मुंबईच्या बाजारात येऊ लागला की दरात चढउतार होऊ लागते. मात्र यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर मंदीचे सावट असले तरी पुरवठाच खुंटल्याने भाववाढ होत आहे.  दरम्यान पुजेसाठी लागणाऱ्या इतर फुलांची मागणी वाढली असून यांचे दरही वधारले आहेत. पावसामुळे मोगऱ्याची आवक घटली आहे.  पूजेसाठी लागणारी चमेली, जास्वंद ही फुले, तसेच दुर्वा  वसई, विरार परिसरातील शेतकरी लोकल रेल्वे गाडय़ांतून घेऊन येतात. जास्वंदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही मात्र अन्य फुलांची आवक लोकल सेवा बंद असल्याने कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

 

मुंबईतील किरकोळ बाजारातील दर

झेंडू – ३०० रुपये किलो, जास्वंद २० रुपयांना बारा फुले, पांढरी शेवंती – १६० रुपये किलो. दुपारनंतर २०० रुपये झाले.लाल किंवा जांभळी शेवंती – ३२० रुपये किलो, डिस्को शेवंती – ४०० रुपये, गुलछडी / रजनीगंधा – ४०० किलो, गुलाब – ८० रुपये २० फुले, वानगाव मोगरा – ६०० रु. किलो, विरार मोगरा – १४०० रुपये, चमेली – ८०० ते १००० रुपये किलो, जरभरा – ५० रुपये १० फुले, दुर्वा मोठी जुडी – ५० रुपये, चाफा – ३०० रुपये शेकडा

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters