नाशिक
नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने आजपासून (दि.२१) बेमुदत कांदा लिलाव बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने कांद्यावर अचानक लादलेल्या ४० टक्के निर्यातकर आकारणीविरोधात असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. त्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद असल्याने साधारणत दोन ते तीन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे. त्यामुळे लिलाव बंदची कोंडी कशी फुटणार? ही प्रशासनापुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान, निर्यात शुल्क लागू केल्यामुळे कागदपत्रे दुरुस्ती आणि तांत्रिक कारणामुळे नाशिकमध्ये कंटेनर अडकले आहेत. कस्टम कार्यालयात जवळपास १८ ते २० कंटेनर थांबले आहे. या कंटेनरमध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा आहे.
बंदला किसान सभेचा पाठिंबा
नाशिकमधील बाजार समिती बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्या बंद ठेऊन रस्त्यावर उतरा, असे आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांच्याकडून करण्यात आले आहे.
Share your comments