1. बातम्या

दुष्काळासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्‍वयाने कार्य करण्याची आवश्यकता

KJ Staff
KJ Staff


मराठवाडयाच्‍या शेतीसमोरील प्रश्‍न संपत ना‍हीत तर प्रश्‍नांचे स्‍वरूप बदलत आहे. हवामान बदलामुळे नवनवीन समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. विधायक दृष्‍टीकोन ठेऊन संकटांना सामोरे गेल्‍यास निश्चितच संकटांची तीव्रता कमी करू शकु. याची प्रचिती आपणास कापसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकरी, कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने राबविलेल्‍या मोहिमेत आली असुन बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यास आपण बऱ्यापैकी यश मिळविले. आपणास याच धर्तीवर दुष्‍काळाचा सामना करण्‍यासाठी कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

कृषी विभाग (महाराष्‍ट्र शासन) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विविध पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला प्रकल्‍प-क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत दिनांक 20 नोव्‍हेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषी विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक यांच्‍या करिता हवामान बदलानुसार सद्य परिस्थितीत पिकांवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन कार्यशाळा विद्यापीठात संपन्‍न झाली, कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, लातुर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. तुकाराम जगताप, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. डी. जी. मुळे, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, या वर्षी कापसाला भाव असल्‍यामुळे ज्‍या भागात पाण्‍याची उपलब्धता आहे, त्‍या भागातील शेतकरी पाणी देऊन कापसाचा फरदड घेत आहेत, यामुळे पुन्‍हा पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक होऊ शकतो. याकरिता शेतकऱ्यांनी कापसाचा फरदड घेऊ नये. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पशुधन वाचविण्‍यासाठी ज्‍या ठिकाणी पाणी उपलब्‍ध आहे, त्‍या भागात चारापिके लागवडीसाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांर्गत असलेले संशोधन केंद्रे तसेच 45 संलग्‍न व घटक महाविद्यालयांच्‍या प्रक्षेत्रावर चारापिक लागवडीचे उदिष्‍टे देण्‍यात येईल. विद्यापीठाकडे विविध चारापिकांचे बेणे (डोंबे) विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. पाण्‍याअभावी फळबाग वाचविण्‍याचेही आव्‍हान आहे, यासाठी विद्यापीठाकडील कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी फळबाग उत्‍पादकांपर्यंत पोहोचवावे. चारा पिकाबरोबरच जी काही रब्बी पिकांची लागवड झाली आहे, त्‍यावरील विविध किड-रोग व्‍यवस्‍थापनावरही भर द्यावा लागेल, विशेषत: लष्‍करी अळीचा प्राद़ुर्भाव रोखण्‍यासाठी पावले उचलावी लागतील, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी आपल्‍या भाषणात ज्‍या भागात काही प्रमाणात पाणी उपलब्‍ध आहे, तेथे पाण्‍याचा कार्यक्षम वापर, चारा उत्‍पादन, अॅझोलो उत्‍पादन आदींवर लक्ष द्यावे लागणार असल्‍याचे सांगितले तर विभागीय कृषी सहसंचालक श्री. तुकाराम जगताप यांनी विद्यापीठाकडील कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍याची जबाबदारी कृषी विभागाची असुन गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्‍या समन्‍वयाने राबविलेल्‍या मोहिमेस शेतकऱ्यांनी दिलेल्‍या प्रतिसादामुळेच यश मिळाले असल्‍याचे प्रतिपादन केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार श्री. सागर खटकाळे यांनी मानले. कार्यशाळेत अमेरीकन लष्‍करी अळी, हुमणी अळीचे व्‍यवस्‍थापन, तुर व हरभरा पिकांवरील किड-रोगाचे व्‍यवस्‍थापन, सद्यस्थितीतील पिकांचे व्‍यवस्‍थापन आदींवर डॉ. पी. आर. झंवर, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर, डॉ. एस. डी. बंटेवाड, डॉ. के. टी. आपेट आदींनी सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, नांदेड व हिगोंली जिल्‍हयातील कृषी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters