1. बातम्या

शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर पाठबळ देणार

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
शेतीपूरक उद्योगांना चालना

शेतीपूरक उद्योगांना चालना

मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र व बसवंत फळप्रक्रिया उद्योग हे शेतीपूरक उद्योगांचे खरोखरच आदर्शवत उदाहरण असून या माध्यमातून शेतकरी बांधवांना विकासाची एक नवी दिशा मिळत आहे, अशा शेतीपूरक उद्योगांना शासन स्तरावर पाठबळ देऊन चालना देणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज पिंपळगाव बसवंत येथील मुखेड तालुक्यातील संजय पवार यांनी साकारलेले मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग व आदर्श गाव सेवरगाव प्रतिकृती पाहणी दौऱ्याच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणाद्वारे तरूण शेतकऱ्यांना निश्चितच रोजगाराची संधी निर्माण होतील. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतीवर अधारीत अनेक उद्योग प्रकल्प राज्यभरात राबविले जात आहे. यात फळांवर प्रक्रिया, कोल्ड स्टोअरेज, गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोहत्सान दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला भविष्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास कृषीमत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

पुढील आठवड्यात कृषी विद्यापीठाचे अधिकारी या ठिकाणी भेट देवून हा प्रकल्प तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहचविता येईल याचे नियोजन करतील असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. जेव्हा माणूस स्वत:चा विचार न करता समाजाच्या हितसाठी स्वताला झोकून देतो, तेव्हाच असे प्रकल्प उभे रहातात. संजय पवार यांनी शासनाची कोणतीही मदत न घेता हा प्रकल्प साकारला आहे.

या शब्दात कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मुधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक, संजय पवार यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दरम्यान निफाड तालुक्यातील उगाव येथे मधुकर गवळी यांनी ॲग्रो मॉलचे उद्घाटन यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले.

ॲग्रो मॉलच्या माध्यमातनू शेतकऱ्यांना एकाच छताखाली उत्तम प्रतीचे बियाणे, खते, रासायनिक फवारणी औषधे, मल्चींग पेपर व शेतीची अवजारे मधुकर गवळी यांनी उपलब्ध करून दिली आहे. येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भाजीपाला व फळांची रोपे उपलब्ध करून दिली जातात. गायत्री नर्सरी ही एक अद्यायावत नर्सरी असून यात माती परीक्षण, पाणी परीक्षण, स्वयंचलित बीजरोपण, शास्त्रशुध्द पद्धतीने दर्जेदार रोपांची निर्मिती, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, शेतीमाल खरेदी, ई-कॉमर्स- ऑनलाईन विक्री केली जाते. युरोपीय देशात विकसित झालेले बेंच ग्राफ्टींगाचा प्रयोग द्राक्षांवर विकसित करण्यात आला आहे.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पुजा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. वाघ, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, निवासी नायब तहसिलदार कल्पना निकुंभ, निफाडचे पोलीस उपनिरिक्षक व्ही. बी. निकम, व्ही. के. राठोड, पोलीस उपनिरिक्षक पुंडलीक पावशे, मुधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक, संजय पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.बी.बी.पवार आदी उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters