शेतकरी आणि त्याच्या दावणीला बांधलेली जनावरे अर्थात त्याचे सोबती यांचे नाते हे अद्वितीय असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका शेतकरी पुत्राने बैलगाड्याने आपल्या लग्नाची वरात काढून शेतकऱ्याचा खरा सोबती बैल याला आपल्या सुखात सामील केले.
तेव्हा शेतकरी आणि बैलाचे अद्वितीय नाते अधोरेखित झाले होते. आता नांदेड जिल्ह्यातूनही शेतकरी आणि त्याच्या दावणीला बांधलेली दुभती जनावरे यांच्यातील अनमोल नाते बघायला मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील मौजे खानापूरचे रहिवासी शेतकरी मारुती मारजवाडे यांना गाईवर विशेष प्रेम आहे. आपल्या सनातन हिंदु धर्मातही गाईला विशेष महत्त्व प्राप्त असून 33 कोटी देवांचा तिच्यात वास असल्याचे सांगितले जाते.
शेतकरी मारुती दोन वर्षापूर्वी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक गाय अगदी बेचार अवस्थेत पडलेली दिसली. गाईला व्यवस्थित चारा पाणी मिळाला नसल्याने ती अशक्त होती आणि तिला चालता देखील येत नव्हते. मारुती यांनी त्या गाई ची अवस्था बघितली आणि रामसुत हनुमानासारखं गाय आपल्या खांद्यावर घेतली आणि घरी घेऊन आले.
गाईला घरी आणल्यानंतर त्यांनी गाईची मनोभावाने सेवा केली. तिला औषध पाणी करून धडधाकट बनविले आणि आता या गाईच्या पोटी एका छानशा वासराने जन्म घेतला आहे. यामुळे मारजवाडे कुटुंबाचा आनंद गगनात मावत नसल्याचे बघायला मिळत आहे.
मारजवाडे यांना पोटी मुलगी नाही त्यामुळे त्यांनी या वासराला आपली मुलगी मानून त्याचं बारसं मोठा गाजावाजा करून पार पाडले आहे. या आगळ्यावेगळ्या बारशाचे संपूर्ण राज्यात कौतुक केले जात आहे.
विशेष म्हणजे मारुती यांनी या शुभ प्रसंगी आपल्या अख्ख्या गावाला जेवण खाऊ घातले तसेच वासराला पाळण्यात बसवुन एखाद्या मुलाच्या बारशाप्रमाणे पाळणे ( बारशाला म्हणतात ती गीते) म्हणत फोटोसेशन पार पाडला. एकंदरीत मारुती यांनी शेतकरी आणि आपल्या दावणीला असलेली जनावरे असं म्हणण्यापेक्षा शेतीमधील आपला सोबती याचे नाते अधोरेखित केले आहे.
Share your comments