रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी संकरित, सुधारित वाणांचा अभाव आणि इतर तांत्रिक कारणांमुळे दिवास्वप्न ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून ‘वैदेही’ या रंगीत कापसाच्या सरळ वाणाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या वाणातील तांत्रिक दोष दूर करून सुधारित वाणाची उपलब्धता किंवा त्यासाठीचे संशोधन त्यापूर्वी व्हावे, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली गेली आहे.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीयस्तरावर नैसर्गिक रंगधारणा असलेल्या कापसाला भविष्यात मागणी राहील, अशी अपेक्षा केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) तसेच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून रंगीत कापसाची लागवड, उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करून धागा व कापड तयार करण्यावर भर दिला गेला आहे. मात्र वैदेही हे सरळ वाण असल्याने त्याची उत्पादकता संकरित वाणाच्या तुलनेत अत्यल्प आहे.
संकरित पांढऱ्या कापसाचे १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन होते. याउलट रंगीत कापसाचे उत्पादन ८ ते ९ क्विंटलच मिळते. फायबर लेंथ, मायक्रोलेयर आणि स्ट्रेंथ या बाबतीही रंगीत कापूस पिछाडीवर आहे. स्ट्रेंथ नसल्याने कापड विणायचा असल्यास त्यात पांढऱ्या धाग्यांची सरमिसळ करावी लागते. स्ट्रेंथ न मिळाल्यास कापसापासून कापडाची प्रक्रिया होऊ शकत नाही.
हेही वाचा : ट्रायकोग्रामा बोंड अळीवरील जालीम उपाय; वाचा शेख आरीफ यांच्या लॅबची यशोगाथा
दरम्यान, अशाप्रकारच्या तांत्रिक अडचणी पहिल्याच टप्प्यात समोर आल्या आहेत. त्यामुळे संस्थेने सुधारित, संकरित वाणाच्या संशोधनावर भर देत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सूर आळवला जात आहे. त्यासोबतच रंगीत आणि पांढऱ्या कापसाचे क्रॉस परागीकरण होत त्यातून मोठा धोका भविष्यात ओढवण्याची भीती देखील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
Share your comments