1. यशकथा

ट्रायकोग्रामा बोंड अळीवरील जालीम उपाय; वाचा शेख आरीफ यांच्या लॅबची यशोगाथा

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतकऱ्यांना दमदार उत्पन्न देणारे व्यापारी पीक म्हणजे कापूस.कापसाची शेती ही खरंच फायदेशीर आणि भरघोस उत्पन्न देणारी असते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा या भागात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.खानदेशातही कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.पण या पिकाला दोन मोठे शाप आहेत, एक म्हणजे दरभाव आणि दुसरं म्हणजे शेतात असताना लागणारी बोंड अळी. बऱ्याच वेळा बाजारात मोठा भाव मिळण्याची शक्यता असताना बोंड अळींने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

या अळीमुळे करोडो एकरावरचे पिकाची नासाडी झाल्याचे आपण पाहिले आहे.त्यात जर शेतकऱ्यांनी बीटी बियाण्याची लागवड केली असेल तर त्याला बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक होत असतो.या किडीला आळा घालण्यासाठी शेतकरी उच्चप्रतीच्या औषधांची फवारणी करत असतो पण ही कीड नियंत्रणात येऊ शकत नाही. यामुळे औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने उत्पादन खर्च वाढत असल्याने कपाशीची शेती शेतकऱ्यांना तोट्याची वाटत आहे. काही दिवसापुर्वी एका वृत्तपत्रात बोंड अळीविषयी बातमी आली होती.यवतमाळ जिल्ह्यातील ही बातमी असून तेथील शेतकरी बोंड अळींच्या हल्ल्यामुळे चिंतातुर झाले आहेत. येथील १ लाख २२ हजार ७५० हेक्टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीने बाधीत झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. २०१७-१८ विदर्भात बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता.

कृषी आणि महसूल खात्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या निकषानुसार वर्ष २०१७-२०१८मध्ये राज्यातील कपाशीखाली असलेल्या ४२ लाख हेक्टरपैकी ८०% पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता.ही अळी बोंडांमध्ये आत जाऊन बसते त्यामुळे बोंडं उमलेपर्यंत शेतकऱ्यांना कसलाच पत्ता लागत नाही.कापूस काढणीच्या वेळी किंवा बाजारात कापूस विकायला नेला की अचानक शेतकऱ्यांना धक्का बसतो कारण अळी असलेल्या कापसाला खूपच कमी भाव मिळतो.एक अळी हजारो अंडी घालते आणि काही दिवसांतच त्यापासून लाखो अळ्या तयार होतात.कापसाच्या एका हंगामात तब्बल चारवेळा अंडी देते. वेळीच लक्ष दिलं नाही तर ही कीड संपूर्ण पीक पोखरून टाकेल, इतक्या झपाट्यात वाढते.अशा अळीला अंडे कोषात असताना मारले तरच पिकांचे नुकसान वाचू शकेल. पण बोंडाच्या आत जाणारं असं एकही औषध नसल्याने बोंड अळीला आळा घालता येणं शक्य नाही.


पण शेतकऱ्यांनो काळजी करु नका,या अळीवर एक जालीम उपाय शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे  शेतकऱ्यांचा मोठा खर्चदेखील वाचणार आहे. हा उपाय आहे, ट्रायकोकार्डवरील ट्रायकोग्रामा. हा ट्रायकोग्रामा बोंडाच्या आत जाऊन  पिकांसाठी मारक असलेल्या अळींना ठार मारत असतो. यामुळे याचा परिणाम हा शंभर टक्के दिसतो. अगदी नैसर्गिक पद्धतीने याची निर्मिती असल्याने पिकाला कोणत्याच प्रकारचा धोका नसतो. पण कृषी विज्ञान केंद्रात मात्र ट्रायकोग्रामाची निर्मिती हवी तितक्या प्रमाणात होत नाही. 

काही प्रयोगशील शेतकरी किंवा काही कृषीशी संबंधित उद्योग करणारे हे कार्ड बनवत आहेत.आज आपण अशाच एका लॅबविषयी जाणून घेणार आहोत. जे ट्रायग्रामाची निर्मिती करत आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ही लॅब आहे. शेख आरीफ नशिरोद्दीन यांनी ''बायोएजंट बायो कंट्रोल'' ही लॅब स्थापित केली असून गेल्या दोन वर्षापासून ट्रायक्रोग्रामाचे संगोपन ते  करत आहेत. या  लॅबच्या कामाची माहिती राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील घेतली आहे. शेख आरीफ यांनी ''कृषी जागरण मराठी''शी आपल्या उपक्रमाविषयी दिलखुलासपणे माहिती दिली. शेख आरीफ हे या लॅबमध्ये शेख आरीफ जैविकमित्र कीड तयार करतात. ही कीड कपाशीवरील बोंड अळीला ठार करण्यास फार उपयुक्त आहे.आता तुमच्यातील अनेक जणांना ट्रायक्रोग्रामा म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. तर आपण आधी ट्रायक्रोग्रामा म्हणजे काय हे जाणून घेऊ. हा एक हानिकराक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोग्रमा हा परोपजीवी कीटक. हा कीटक जगातील बहुतेक देशात सरस ठरला आहे. हा कीटक गांधीलमाशीच्या जातीचा असून आकाराने अतिशय लहान आहे. या कीटकाची लांबी ही ०.४ ते ०.७  मि.मी व जाडी ०.१५ ते०.२५ मि.मी असते. ट्रायकोग्रामाच्या जगात साधरण १५० प्रजाती आहेत. या ट्रायकोग्रामाच्या प्रजाती जगभरात विखुरलेल्या ८ वर्गातील व ७०कुळातील साधरण ४०० विविध किडींच्या अंड्यावर आपली उपजीविका करतात.


भारतात ट्रायकोग्रामाच्या २६ प्रजाती आढळून येतात. साक्री येथील शेख आरिफ यांच्या बायोएजंट बायो कंट्रोल ट्रायकोग्रामा निर्मिती प्रयोगशाळेतील काम नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रयोगशाळेचे संचालक शेख आरीफ हे वर्षाला तीन बॅचचे उत्पन्न घेत असतात. खरीप हंगामात या ट्रायकोकार्डला खूप मागणी राहते असे शेख आरीफ सांगतात.आपल्या या प्रयोगशाळेविषयी शेख  सांगतात की, हा त्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. गेल्या दोन वर्षापासून शेख आरीफ ट्रायकोग्रामाची निर्मिती करत आहेत. याआधी त्यांनी २००६ ते २००७ मध्येही अगदी छोट्या पातळीवर त्यांनी या प्रयोगाची चाचपणी केली होती. साधरण शंभर ट्रेमध्ये त्यांनी कारसेरा पतंगाची निर्मिती केली. यात आपल्याला यश मिळू शकते,अशी शाश्वती झाल्यानंतर शेख आरीफ यांनी मोठ्या पातळीवर हा प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. त्यावेळी त्यांनी सोनकुल ऍग्रो इंडस्ट्रिचे संचालक महेश वाणी यांचे मार्गदर्शन घेतले.शेख यांच्या प्रकल्पासाठी महेश वाणी यांनी मदत देखील केली. महेश वाणीसह धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक  डॉ. नंडारे , कीटक शास्त्रज्ञ डॉ पंकज पाटील, आत्मा धुळ्याचे मालपुरे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनीही शेख आरीफ यांच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोग शाळा उभारणीसाठी टेक्निकल मार्गदर्शन केले आहे.आपल्या प्रकल्पाला मदत करणाऱ्यांचा उल्लेख शेख नेहमी करत असतात.सुरुवातीला छोट्या पातळीवर हा प्रकल्प चालू केल्यानंतर आरीफ शेख यांनी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातून ट्रायकोग्रामा निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. 

 

सध्या स्थितीला १५०० ट्रे इतक्या प्रमाणात पतंग तयार केली जातात. या प्रकल्पासाठी शेख आरीफ यांनी आपल्या घरातील पैसा भांडवल म्हणून वापराला असून साधरण १० ते १२ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे शेख सांगतात. शेख आरीफ नशिरोद्दीन हे प्राध्यापक आहेत, त्यांनी वनस्पतीशास्त्रातून एम.एस्सीची पदव्युत्तरची पदवी घेतली आहे. दरम्यान आपल्या उपक्रामाविषयी माहिती देताना आरीफ शेख यांनी एक खंत व्यक्त केली. ते म्हणाले की,‘’शासन याविषयी प्रशिक्षण देत असते. जेणेकरुन उद्योगशील व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करु शकतील. पण दुसऱ्या बाजुला सरकार सांगते की, सरकारमान्य संस्थेने तयार केलेले ट्रायकोग्रामाच शेतकऱ्यांनी घ्यावे. पण शासकीय संस्था मात्र फार कमी प्रमाणात यांची निर्मिती करतात. यामुळे सरकारने खासगी उद्योजकांनी तयार केलेली मित्र कीटक घेण्यास शेतकऱ्यांना सांगावे’’. 

 

आरीफ शेख यांनी निर्मित केलेल्या ट्रायकोग्रामाला अनेक शेतकऱ्यांकडून मागणी असते. धुळे, जळगाव, साक्री, नंदुरबार, आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी थेट संपर्क करुन त्यांच्याकडून हे मित्रकीटक नेत असतात. इतकेच काय कृषी क्षेत्रात काम करणारे एनजीओ,नाबार्ड सारख्या संस्थाही त्यांच्याकडून हे मित्रकीटक नेत असतात. मागील वर्षी आरीफ् शेख यांनी साधरण ९ ते १० लाख रुपयांचा व्यवसाय केला होता. यावर्षी कोरोना या महामारीमुळे मागणी कमी असल्याचे आरीफ शेख यांनी कृषी जागरण मराठीशी बोलताना सांगितले. सरकारने अशा उद्योजकांना काही अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी कृषी जागरणच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

 कारसेरा पतंग तयार करणासाठी काय खाद्य लागते

अडीच किलो ज्वारीचा भरडा

शंभर ग्रॅम  शेंगदाणाचे कूट

स्टेप्टोमाइसिन सल्फेट

इस्ट

आणि सल्फर पावडर  सगळे योग्य प्रमाणात ट्रेमध्ये टाकावे. त्यानंतर  अर्धा सीसी क्रारसेराची अंडी टाकावी. अर्धा सीसीमध्ये साधरण ८ ते १० हजार अंडी असतात अशी माहिती आरीफ शेख यांनी दिली.

कसे तयार होतात कारसेरा पतंग-

हे सर्व घटक टाकल्यानंतर ट्रेला कापड्याने बांधले जाते. साधरण ४० ते ४५ दिवसात याच्यात अळी तयार होते. मग त्याचे कोशात रुपांतर होते, कोशातून ते पतंगात परावर्तित होत असतात. मग हे पतंग साधरण दीड ते दोन महिने निघत असतात. पतंग तयार झाल्यानंतर हे एका बाटलीत भरले जातात. त्यानंतर ते अंडी देणाऱ्या बकेटमध्ये म्हणजे इग्ज लेईग केक बकेट मध्ये हे पतंग टाकली जातात. या बकेटला जाळी असते. त्यातून अंडी खाली पडत असतात. साधरण पाच दिवसात हे पतंग अंडी देत असतात आणि मृत होत असतात. प्लेट मध्ये पडलेली अंडी सुफात साफ केली जातात. त्यानंतर ईव्ही ट्रीट केले जाते. त्यानंतर ट्रायकोकार्डवरती या अंड्यांची पेस्टीग म्हणजेच चिटकवले जातात. मग ते कार्ड एका प्लास्टिकच्या बरणीत ठेवले जाते. तेथे परोपजिवीकरण केले जाते. या बरणीमध्ये एक मदरकार्ड टाकले जाते त्यानंतर ट्रायक्रोगामा बाहेर पडत असतो. 


ट्रायकोकार्ड कसे वापरावे

या कार्डवर परोपजिवीकरणाची दिनांक आणि ट्रायकोग्रमा बाहेर पडण्याचा  अपेक्षित दिनांक, शितकरण दिनांक व कार्ड वापरण्याची अंतिम तारीख आदीची माहिती असते.

कोणत्या किडींसाठी आहे उपयुक्त

कापसावरील बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी, हेलिकोवर्पा आणि गुलाबी बोंड अळी  यांच्या अंडी नाश करतो.

तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी.

उसावरील खोडकिडा.

टोमॅटो,भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी.

भुईमूग, सूर्यफुलावरीलल अळी.

भात, ज्वारी,मका या पिकांवरील येणारे पतंवर्गीय किडींचा नाश करतात.

कोणत्या पिकाला कोणत्या परजातीचे ट्रायकोग्रामा असते आवश्यक

उस – खोडकिडा – चिलोनीस व जपोनीकम

भातावरील खोड किडासाठी  जपोनीकम

मका – खोडकिडा  - चिलोनीस

मका – अमेरिकन लष्करी अळी  - पिटीओसम

कपाशी- बोंड अळ्या – चिलोनीस व बॅक्ट्री

टोमॅटो – फळ पोखरणारी अळी – जपोनीकम

वांगी  - फळ पोखरणारी अळी – जपोनीकम

भेंडी – फळ पोखरणारी अळी – जपोनीकम


ट्रायकोकार्डचा कसा उपयोग केला जातो

प्रयोगशाळेत कार्डवर परोपजिवकीकरण झाल्यानंतर साधरण ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे पुर्ण वाढ होऊन ते बाहेर पडत असतात.पूर्णपणे काळे पडलेले ट्रायकोकार्ड हे प्रौढ बाहेर पडण्यापुर्वी किडींच्या नियंत्रणासाठी  वापरणे आवश्यक असते. हे कार्ड वेळीच वापरता येत नसतील तर १०ते १५ दिवस १० अंश सेल्सिअस तापमानास फ्रिजमध्ये साठविता येतात. वापरायच्या वेळी फ्रिजमधून काढून थोडा वेळ सामान्य तापमानाला ठेवावीत, त्यानंतर शेतामध्ये वापराता येतात.  एका एकरसाठी साधरण तीन कार्ड लागत असतात. एका कार्डमध्ये १६ ते १८ हजार अंडी असतात. शेतात हे कार्ड टॅग करत असताना एक स्ट्रीप ही १० मीटरच्या अंतरावर लावावी. झाडांच्या पानांखाली ही स्ट्रीप टॅग करावी.

 ट्रायकोग्रामा किडींना कसा ठार करतो

 ट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा असतो अतिशय सुक्ष्म आकाराचा ०.४० ते ०.७० मिमि असतो. ट्रायकोग्रामा हा आपल्या शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही. हा सूक्ष्म किडा शेतात फिरून बोंड अळ्यांचे अंडे शोधून काढतो. किडीच्या अंड्यामध्ये स्वत:चे अंडे टाकतो. ट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६ ते  २४  तास असते, अशी माहिती आरीफ शेख यांनी दिली.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा - 

 शेख आरीफ  -  मोबाईल नंबर - 9822165368.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters