
Minister Pankaja Munde News
पुणे : पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत, आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी नुकताच घेतला होता. या बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात श्रीमती. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी, आयुक्त प्रवीण कुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता, त्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही, त्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, ज्याची पत नाही, ऐपत नाही त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहे, अगदी तोच वारसा घेऊन मी काम करत आहे.
माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता, त्यामुळे हा निर्णय घेतला. सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्वाचा वाटतो. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारे, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे, असं मंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या.
लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी- सचिव डॉ. रामास्वामी एन.
पशुवैद्यकीय शिक्षणानंतर शासन सेवेत पदार्पण करणाऱ्या पशुवैद्यकांना लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होत असते. पशुसंवर्धन विभागाचा आजवरचा गौरव टिकवून ठेवत या विभागाची प्रतिष्ठा आणखी उंचावण्याची सामुहिक जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता क्षेत्रीय स्तरावर सहजतेने करुन देणे आवश्यक आहे. या कामात समर्पित वृत्तीने सर्वांनी योगदान देत विभागाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
Share your comments