1. बातम्या

मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

KJ Maharashtra
KJ Maharashtra


सांगली:
गतवर्षी १ ते १० ऑगस्ट या काळात धरणक्षेत्रात १,८०० मिलीमिटर पाऊस झाला तर अन्यत्र ३२१ मिलीमिटर पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली. यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास सक्षमतेने हाताळण्यासाठी प्रशासनाची तयारी सज्ज असल्याचे सांगून येत्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णाकाठच्या लोकप्रतिनिधींना बोलावून वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा व कोरोना आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. गुणाले, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, आवश्यक सामुग्री अद्ययावत ठेवावी असे निर्देश देऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महसूल मंडळनिहाय पावसाची दैनंदिन माहिती सकाळी ८ वाजता व सायकाळी ६ वाजता अशा दोन्ही वेळेला घ्यावी. पाण्याखाली जाणारी गावे, प्रामुख्याने नदीकाठची गावे या ठिकाणी पाणीपातळी बद्दल नागरिकांना त्वरित अवगत करण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा व्यवस्थित ठेवावी व त्याप्रमाणे पाणी पातळीत वाढ होत असताना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करावे. रेस्क्युसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसू नयेत यासाठी बोटीच्या सर्व बाजूंनी तिची मन्युष्य क्षमता ठळकपणे लिहावी, कोणत्याही परिस्थितीत ब्रम्हनाळ सारखी घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. पूरप्रवर क्षेत्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल करावे. ज्या नागरिकांकडे जनावरे आहेत. त्यांनी पाणी पातळीत वाढ होण्याची सूचना मिळताच जनावरांसह सुरक्षितस्थळी जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांशीही समन्वय साधण्यात येत असल्याचे सांगून या बैठकीत त्यांनी पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांचा आढावा घेतला. गतवर्षीच्या पूराचा अनुभव लक्षात घेऊन जलसंपदा विभागकडून वेळेवर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून, मान्सून काळात यंत्रणेतील प्रत्येक घटकाने दक्ष रहावे. आपले दूरध्वनी, मोबाईल फोन २४ तास सुरु ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते बी-बियाणे, किटकनाशके पुरेशा प्रमाणत उपलब्ध करुन द्या, बोगस बियाणांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही त्याची दक्षताही कृषी विभागाने घ्यावी. पावसाळ्यातील साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा, उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी, जनावरांचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters