महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा या नगदी पिकाची शेती केली जाते. देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त मराठवाड्यात तसेच राज्यातील इतरही विभागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाली असल्याने कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या मिळत असलेल्या दरात कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील काढणे अवघड असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करत आहेत. यामुळे सांगा बरं शेती करायची कशी असा मार्मिक सवाल आता कांदा उत्पादक उपस्थित करीत आहेत.
सामान्य नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढणारा कांदा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढत असल्याचे चित्र या वेळी राज्यात बघायला मिळत आहे. नुकताच दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एपीएमसीमध्ये कांद्याला मात्र एक रुपये किलो अर्थात शंभर रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल दर मिळाला यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील वर्षी कांद्याला समाधानकारक बाजार भाव असल्याने या वर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड बघायला मिळत आहे. विशेषता पैठण तालुक्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली गेली आहे. सध्या तालुक्यासमवेतच संपूर्ण राज्यात उन्हाळी कांदा काढण्याचे कार्य करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत आहेत. उन्हाळी कांदा काढणी केल्यानंतर शेतकरी बांधव कवडीमोल दर मिळत असल्याने साठवणुकीवर भर देत आहेत मात्र असे असले तरी साठवणुकीसाठी देखील शेतकऱ्यांवर काही मर्यादा आहेत. साठवणुकीसाठी पुरेसे साधन उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना सर्व कांदा साठवणूक करून ठेवणे अशक्य आहे.
यामुळे शेतकरी बांधव कांदा चाळीत बसेल तेवढा कांदा साठवणूक करून ठेवत आहेत आणि बाकीचा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत आपला सोन्यासारखा कांदा विक्री करावा लागत आहे. आधीच शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत होता, हे कमी होते की काय म्हणून महावितरणची वीज तोडणी आणि लोडशेडिंग तसेच वाढत्या खतांच्या दराचा देखील त्याला सामना करावा लागला. आता या सर्व संकटातून बळीराजाने मोठ्या कष्टाने आपला सोन्यासारखा शेतीमाल उत्पादित केला मात्र आता बाजारपेठेत शेतीमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवरची संकटाची मालिका अजूनही संपलेली दिसत नाही.
Share your comments