राज्यात सध्या सर्वत्र कांदा उत्पादक शेतकरी खरीप हंगामातील लाल कांदा विक्रीसाठी लगबग करत आहेत तसेच उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी पूर्वतयारी करत आहेत. कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थातच कसमादे पट्ट्यात देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड होण्याचे संकेत मिळत आहेत. यावर्षी खरीप हंगामात परिसरात नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शिवारातील विहिरी सध्या तुडुंब भरलेल्या दिसत आहेत त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी मुबलक पाण्याचा साठा असल्याने उन्हाळी कांद्याची लागवड या वर्षात मोठ्या प्रमाणात नजरेस पडू शकते. त्यासाठी शिवारातील शेतकरी पुर्व मशागतीचे कामे करताना बघायला मिळत आहेत.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीसाठी हीच योग्य वेळ आहे. उन्हाळी कांद्यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी कांदा लागवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घेणे अपरिहार्य ठरते. आज आपण उन्हाळी कांदा लागवड करताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या राज्यात अनेक भागात उन्हाळी कांदा लागवड होताना बघायला मिळत आहे, यावर्षी राज्यात पाण्याचा साठा मुबलक उपलब्ध असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र असे असले तरी, उन्हाळी कांदा लागवड करताना योग्य काळजी घेतली तरच उन्हाळी कांद्याचे दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकते.
उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी रोपे सहा आठवड्यापेक्षा अधिक ची जुनी असता कामा नये. साधारणता पाच ते सहा आठवड्याची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. उन्हाळी कांद्याची लागवड लहान वाफ्यातच करणे अधिक सोयीचे आणि पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. उन्हाळी कांद्याची चांगली वाढ होण्यासाठी, शेतात सेंद्रिय खत असणे अनिवार्य आहे आपण यासाठी लागवडीच्या आधी दहा ते पंधरा दिवस अगदि पूर्वमशागतीच्या वेळी चांगल्या क्वालिटीचे जुने कुजलेले शेणखत एकरी 20 ते 25 टन या प्रमाणात घेऊन जमिनीत मिसळू शकता.
सेंद्रिय खताव्यतिरिक्त जमिनीत मूलभूत अन्नद्रव्याची कमतरता भासू नये यासाठी आपण जमिनीत योग्य प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश मिसळणे गरजेचे राहणार आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, एकरी 20 किलो नायट्रोजन, 60 किलो फॉस्फरस आणि 80 किलो पोटॅश जमिनीत टाकल्यास त्यापासून कांद्याची दर्जेदार वाढ होऊ शकते. कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड करत असताना, रोपांना जास्त खोलवर लावू नये, कांदा लावताना कांद्याच्या दोन ओळींतील अंतर 15 सेंटिमीटर तर कांद्याच्या रोपांतील अंतर दहा सेंटिमीटर असावे.
Share your comments