1. बातम्या

अटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यूकल्चर बांबू रोपांचा पुरवठा

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी 'अटल बांबू समृद्धी योजना' ही नवीन योजना राबविण्यास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बांबू हे बहुपयोगी वनोपज असून त्यास हिरवे सोने संबोधले जाते. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. देशात बांबूची बाजारपेठ 26 हजार कोटी रुपयांची असून त्याद्वारे बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्री, प्लायबोर्ड अशा अनेक उद्योग-व्यवसायांना चालना मिळते, तसेच रोजगाराची संधी निर्माण होते.

हे लक्षात घेऊन उत्तम गुणधर्म असलेल्या टिश्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतकऱ्यांना शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीसाठी उपलब्ध करून दिल्यास यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यातून बांबू लागवडीखालचे क्षेत्रही वाढेल. महाराष्ट्रात मानवेल, कटांग आणि माणगा या प्रजाती आढळतात, या स्थानिक प्रजातींव्यतिरिक्त आणखी 5 प्रजातींची निवड यात करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. बांबू रोपे खरेदी करून लागवडीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, तसेच शासनाकडून प्रमाणित झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेत 4 हेक्टरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 1 हेक्टर मर्यादेपर्यंत 600 बांबू रोपे 80 टक्के सवलतीच्या दराने व 4 हेक्टरपेक्षा अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 1 हेक्टरपर्यंत 600 बांबू रोपे 50 टक्के सवलतीच्या दराने मिळणार आहेत अशीही माहिती वनमंत्र्यांनी दिली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters