नवी दिल्ली: कोविड-19 लॉकडाऊनमुळे मालवाहतूकविषयक आणि इतर आव्हाने निर्माण होऊनही राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या एनपीके सुफला या प्रकारच्या खताच्या विक्रीत एप्रिल महिन्यात तब्बल 35.47 टक्के वाढीची नोंद केली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न मिळावे म्हणून शेतीच्या पोषणमूल्यविषयक गरजा भागवण्यासाठी आरसीएफने दाखवलेल्या वृत्तीची सदानंद गौडा यांनी प्रशंसा केली आहे आणि आरसीफचे अभिनंदन केले आहे. कोविड-19 महामारीला प्रतिबंध करण्यासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्या मंत्रालयांतर्गत असलेले सार्वजनिक उपक्रम अतोनात कष्ट करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या खत विभागाशिवाय आपण स्वतः कृषी मंत्रालये/केंद्राचे इतर संबंधित विभाग आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश यामधील आपल्या समपदस्थांच्या सातत्याने संपर्कात असून खतांचे उत्पादन, वाहतूक आणि पेरणीच्या काळात आवश्यक असलेल्या वितरणाच्या सोयीसुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा करत आहोत, असे गौडा म्हणाले. कोविड-19 महामारीच्या खडतर काळातही आरसीएफने महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांना खतांचा अखंड पुरवठा होत राहील याची काळजी घेतली, असे ट्वीट आरसीएफचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. सी. मुदगेरीकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना खतांचा पुरवठा त्यांच्या शेतीच्या बांधावर केला जात आहे. याशिवाय आरसीएफच्या ट्रॉम्बे येथील कारखान्याने 6,178 MKcal/MT ऊर्जा कार्यक्षमतेचा नवा विक्रम नोंदवला आहे.
आरसीएफने समाजातील गरजूंना लाभ मिळवून देण्याच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वावरील भक्कम विश्वासाचा एक भाग म्हणून पीएम केअर्स फंडमध्ये 83.56 लाख रुपयांचे आणि महाराष्ट्रातील सीएमआरएफ फंडमध्ये 83.50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. या उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला असून आपल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम या निधीमध्ये दिली आहे. आरसीएफने सीएसआरच्या माध्यमातून दिलेल्या पन्नास लाख रुपयांव्यतिरिक्त हे योगदान आहे. आरसीएफ हा मिनी रत्न उपक्रम देशातील खते आणि रसायनांचा आघाडीवरील उत्पादक आहे.
या उपक्रमाच्या कारखान्यांमध्ये युरिया, मिश्र खते, जैव खते, सूक्ष्म पोषण घटक, पाण्यात विद्राव्य खते, मृदा पोषक घटक आणि अनेक प्रकारच्या औद्योगिक रसायनांचे उत्पादन करण्यात येते. ही कंपनी म्हणजे ग्रामीण भारतातील घराघरात पोहोचलेले नाव असून त्यांचे उज्वला (युरिया) आणि सुफला (मिश्र खते) हे अतिशय प्रसिद्ध ब्रँड बनले आहेत. खतांच्या उत्पादनांव्यतिरिक्त आरसीएफकडून उद्योगांमध्ये डाय, विरंजक, चामडे, औषध निर्मितीच्या निर्मितीसाठी लागणारी औद्योगिक रसायने आणि इतर अनेक प्रकारच्या रसायनांचे उत्पादन करण्यात येते.
Share your comments