मुंबई: दर घसरल्याने राज्य शासनाने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंत विक्री झालेल्या शेतकऱ्यांचा कांद्याला प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ही मुदत 31 डिसेंबर 2018 पर्यंत विक्री झालेल्या कांद्यासाठी वाढवून देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा, असे निर्देश सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले, कांद्याचे दर घसरल्याने शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर ते 15डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले आहे. परंतु, आजही कांदा दरात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्याची मागणी होत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे.
याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अनुदानासाठीच्या मुदतवाढीचा सविस्तर प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
Share your comments