1. बातम्या

लातूरमधील लोदगा गावातून होणार हवामान बदलाचा अभ्यास

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या लोदगा या छोट्याशा गावातून हवामान बदलाचा अभ्यास जानेवारीपासून होणार असल्याची माहिती, महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेची 61 वी सर्वसाधारण बैठक पार पडली. या संस्थेचे सदस्य म्हणून श्री. पटेल हे बैठकीत उपस्थित होते.

बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत श्री. पटेल यांनी सांगितले, पावसाची अनियमितता वाढत आहे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात  शेत जमिनीत सहज पाणी उपलब्ध होत असे. आता मात्र, 1,000 फुटांवरही बोरवेलला पाणी मिळत नाही. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश भागात दरवर्षी दुष्काळाचे सावट राहते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे सर्व परिणाम  हवामान बदलामुळे घडून येत आहेत. यावर अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. पटेल यांनी या विषयीचे सविस्तर निवेदन केंद्रीय मंत्री श्री. तोमर यांना दिले.

केंद्रीय मंत्री श्री. तोमर यांनी ग्रामीण विकास व पंचायत राज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील लोदगा गावापासूनच हवामान बदलाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती श्री पटेल यांनी दिली. ही संस्था ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी संशोधनात्मक आणि प्रशिक्षणाचे कार्य करते.  

याअंतर्गत जानेवारीमध्ये स्थानिक अशासकीय संस्थांची मदत घेऊन हवामान बदलाबाबत अभ्यासाची सुरूवात होऊन जनजागृती कार्यक्रम आखले जातील, असे आश्वासन श्री. तोमर यांनी दिल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters