1. बातम्या

राज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना'

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ॲग्रो वर्ल्ड-2018’ परिषदेत आज दिली.

येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्प्लेक्समध्ये भारतीय कृषी व खाद्य परिषदेच्या वतीने व केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘ॲग्रो वर्ल्ड 2018’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. जानकर बोलत होते. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याणमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मिझोरमचे राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी विचार मांडताना श्री. जानकर यांनी गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय व त्याचा झालेला सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली. राज्यात पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेसाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती  व अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील जनतेला ‘मागेल त्याला पशुधन’ या तत्वावर प्रत्येकी एक गाय, म्हैस, शेळी, मेंढी आदी पशुधन देण्यात येणार आहे.

राज्य शासन बँकांच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांची बँकेकडून छाननी करण्यात येणार असून पात्र शेतक-यास पशुधनासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters