1. बातम्या

औरंगाबादमध्ये कृत्रिम रेतन लॅब सुरु करणार

KJ Staff
KJ Staff


जालना:
शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा उत्तम मार्ग आहे. पशुपालनात विविध जातींचे संवर्धन होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब (प्रयोगशाळा) महत्त्वाची आहे. म्हणून ही लॅब मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखिल भारतीय स्तरावरील महा पशुधन प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समांरभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सर्वश्री आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, प्रधान सचिव अनूपकुमार, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशातले सर्वात भव्य असे हे महाएक्स्पो प्रदर्शन आहे. देशात पशुपक्ष्यांच्या प्रजातीला एकत्र करण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाले आहे. पशुसंवर्धन, चारा याबरोबरच पशुपक्ष्याच्यां संवर्धनाचे प्रशिक्षण येथे अनुभवयास मिळाले. एवढचे नव्हे तर प्रदर्शन शेतकरी आणि पशुपालकांसाठी आदर्श अशी कार्यशाळा ठरली आहे. पाच लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. ही या प्रदर्शनाची उपयुक्तता आहे. शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसाय निवडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली तेथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. शासनामार्फत पशुपालकांसाठी 243 कोटी रुपयांची जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा फायदा बहुसंख्य लाभार्थ्यांना झालेला आहे. पशुखाद्याबरोबरच पशुपालकांना कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले. 


राज्यात मराठवाडा आणि विदर्भ विभाग दुध उत्पादनात आघाडीवर होते. परंतु या भागातील शेतकरी कापूस, सोयाबीन पिकांकडे वळल्यामुळे चारा उत्पादनात घट झाली. पर्यायाने या भागात दुधाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शासनामार्फत दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी लिटरमागे पाच रुपये प्रमाणे 500 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 250 कोटी रुपयांचे अनुदान दुध उत्पादकांना वाटप करण्यात आले आहे. पशुपालकांसाठी जेनेरिक औषधी आणि रुग्णवाहिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पशुवसंवर्धन विभागाने पशुंसाठी असलेली जेनेरिक औषधे पशुपालकांना उपलब्ध व्हावी. तसेच पशुंसाठी आवश्यक रुग्णवाहिका याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. फडणवीस यांनी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे सुरु केलेल्या योजनांचीही अंमलबजावणी करण्यात राज्य आघाडीवर आहे. या केंद्राच्या योजनांमधून राज्यात नीलक्रांती झाली आहे. त्याचबरोबर राज्याच्या महामेष योजनेतून मेंढीपालन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पशुपालकांसाठी वृक्ष संवर्धन, पशुपक्षी संवर्धन महत्त्वाचे असून यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री श्री खोतकर यांनी गायींच्या संवर्धनासाठी त्यांचा विमा उतरविण्यात यावा याबाबत प्रास्ताविकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री पशुधन योजना राबविणार असल्याची घोषणा यावेळी केली. प्रास्ताविकात राज्यमंत्री श्री. खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या या एक्स्पो उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिला आहे. या प्रदर्शनात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्व पशुपक्षी यात दाखल झालेले आहेत. दोन दिवसात पाच लाख शेतकरी बांधवांनी या ठिकाणी भेट दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनात दाखल झालेल्या पशुपालकांना बक्षीसांचे वितरणही करण्यात आले. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी दुग्ध व्यावसायिकांच्या यशकथा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाएक्स्पोच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters