खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य पीक कापसासमवेतच सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाल्याचे नमूद करण्यात आले.
एकीकडे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला कधी नव्हे ती मागणी आली या एकंदरीत समीकरणामुळे कापसाला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावला होता. आता सोयाबीनच्या दरातही वाढ नमूद करण्यात येत आहे.
यामुळे सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे मात्र ही वाढ मोठ्या संथगतीने होत आहे. सोयाबीन साठी प्रसिद्ध असलेल्या लातूर एपीएमसीमध्ये गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. या दरात सध्या 50 रुपयांची वाढ नमूद केली गेली आहे.
सोयाबीनच्या दरात झालेली वाढ ही खूपच नगण्य असली तरीदेखील भविष्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याचे संकेत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. सोयाबीनच्या दरात थोडी का होईना वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया पुन्हाएकदा उंचावल्या आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा सोयाबीनची साठवणूक करतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.
सोयाबीनच्या किमतीत चढ-उतार म्हणून शेतकरी संभ्रमात
गेल्या अनेक महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या महिन्यात 7,600 रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्यानंतर सोयाबीन गेल्या काही दिवसांपासून 7,200 रुपयांवर स्थिर होता. मात्र, या आठवड्यात सोयाबीनच्या भावात सकारात्मक बदल झाला आहे. सोयाबीन 7,200 रुपयांवरून 7,250 रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपला आहे.
यामुळे सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल 50 रुपये वाढ नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात झालेल्या बदलामुळे शेतकरी समाधानी होणार आणि सोयाबीनची विक्री करणार की साठवणुकीवर भर देणार आणि दरवाढीची आशा पाहणार हे विशेष बघण्यासारखे असेल. असे असले तरी अनेक शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असून 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरच विक्री करू असे सांगत आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
भावा फक्त तूच रे……! कमी खर्चात कलिंगड आणि मिरचीचे उत्पादन घेऊन 'हा' शेतकरी बनला मालामाल
अबब…! 150 किलो वजनाचा,पाच फूट उंचीचा ''पुष्पा'' बोकड आहे 'इतक्या' किमतीचा
Share your comments