1. बातम्या

सिंधुदुर्ग विमानतळामुळे शेतमाल व सागरी उत्पादनास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध

KJ Staff
KJ Staff


सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाची टेस्ट लँडिंग करण्यासाठी पूर्व तयारी करण्यात आली असून बुधवारी दि. 12 सप्टेंबर रोजी मुंबईहून सिंधुदूर्गमध्ये गणपतीच्या मूर्तीसह 12 आसनी विमानाचे लँडिंग होणार आहे, अशी माहिती सिंधुदूर्गचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईहून आणण्यात येणाऱ्या गणपतीच्या मूर्तीची विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर नियमित विमानसेवा सुरु होणार असून येत्या 12 डिसेंबर रोजी सिंधुदूर्गच्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित झाल्यावर माल्टा देशाचे प्रधानमंत्री हे सिंधुदूर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. सिंधुदूर्ग ते दुबई हे अवघ्या दोन तासाचे अंतर असून या विमानसेवेच्या माध्यमातून दुबईला ताजी मच्छी व सागरी खाद्याची निर्यात करता येणार आहे. तसेच सागर किनारी जमिनी असलेल्या मालकांना दोन टक्के दराने हॉटेल व लॉजिंगसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना सहज निवारा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील रोजगारामध्येही वाढ होणार आहे,अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

बँक व खासगी गुंतवणुकदारांकडून अल्पदरात गीर व साहिवाल या उपयुक्त गायी घेण्यासाठी स्थानिकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या गायींपासून मिळणारे तूप व दुग्धजन्य पदार्थांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा हापूस आंबा, नारळ, काजू या फळांना देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये वर्षभरात सरासरी 14 लाख पर्यटक भेट देतात. या विमानसेवेमुळे देश विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी माहिती श्री.केसरकर यांनी दिली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters