बिहार सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. नितीश कुमार यांचे सरकार शेतकरी आणि पशुपालकांकडून निश्चित किमतीत शेण खरेदी करणार आणि खरेदी केलेल्या शेणापासून मिथेन वायू बनवणार असून त्याचा खेड्यापाड्यात पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती सरकारने दिली आहे. शेणापासून मिथेन वायू तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्लांट उभारण्यात येणार आहेत.
त्याचा उपयोग गावांमध्ये दिवाबत्तीसाठीही केला जाणार आहे. यासोबतच हा गॅस स्वयंपाकासाठी सिलिंडरमध्येही भरला जाणार आहे राज्य सरकार लवकरच हे काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या बिहारमध्ये गुरांची संख्या २.५ कोटींहून अधिक आहे, ज्यामध्ये सुमारे १.५४ कोटी गायींचा समावेश आहे.
बिहार सरकारने शेणापासून मिथेन वायू तयार करण्यासाठी गोवर्धन योजना सुरू केली आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, शेतकरी आणि पशुपालकांकडून खरेदी केलेल्या शेणापासून मिथेन गॅस तयार करण्यासाठी शासन प्रत्येक जिल्ह्यात एक प्लांट तयार करेल. ही जबाबदारी एका एजन्सीला दिली जाईल. एजन्सी निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांकडून शेणाची खरेदी कोणत्या दराने केली जाणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही याबाबत अधिकृत माहिती समजली नाही. छत्तीसगडमध्येही अशीच योजना सुरू आहे. गोवर्धन योजना सुरू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन शेतकरी व पशुपालकांची भरभराट होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या बातमीनुसार, मिथेन गॅस तयार करण्यासाठी प्लांट उभारण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन जमिनीची निवड करणार आहे पुढील प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच करणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्लांटसाठी जमीन निवडण्याचे काम सुरू झाले आहे. २०२५ पर्यंत बिहारच्या सर्व जिल्ह्यांतील प्लांटमधून उत्पादन सुरू होईल यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
या योजनेची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लांटमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून वर्मी कंपोस्ट तयार केले जाईल. सेंद्रिय शेतीसाठी वर्मी कंपोस्ट हे अत्यंत महत्त्वाचे खत आहे. बिहारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी गंगेच्या दोन्ही तीरांवर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. प्लांटच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या गांडूळ कंपोस्टमुळे येथे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही. यासोबतच सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
ड्रोन खरेदी आता होणार सोपी; सरकारकडून मिळणार भरघोस अनुदान
भेंडवळची भविष्यवाणी आली! यावर्षी राहणार पावसाळा सर्वसाधारण, तिसऱ्या व चौथ्या महिन्यात भरपूर पावसाचे भाकीत
Share your comments