कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजुला अनलॉकच्या दिशेनेही वाटचाल करत आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले आहेत तर अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. तर ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असे राज्य सरकारने यावेळी सांगितले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे. ३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान राज्यात खालीलप्रमाणे निर्बध असणार आहेत -
- सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे.
- सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे.
- दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देऊ नये.
- मोठया संख्येने लोकांना एकत्र जमता येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी आहे. पण पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त नसावी.
- अंत्यविधीच्यावेळी सुद्धा ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू खायला मनाई आहे.
- कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर व बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल तसेच हँड वॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
Share your comments