निफाड: सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार महायुद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय सोयाबीनला मागणी वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आकाशाला गवसणी घालू पाहत आहेत. सध्या राज्यातील सर्वच बाजारपेठेत सोयाबीनला ऐतिहासिक विक्रमी दर मिळत आहे. जगात तयार झालेल्या या समीकरणामुळे नाशिक जिल्ह्यातुन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध नक्कीच एक दुःखद आणि मोठे धक्कादायक आहे. परंतु या युद्धामुळे आणि जागतिक बाजारपेठेत अचानक वाढलेल्या भारतीय सोयाबीनच्या मागणीमुळे पालखेडच्या उपबाजार समितीच्या आवारात सोयाबीनला 7 हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळत आहे.
सध्या उपबाजार समितीत मिळत असलेला हा उच्चांकी दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असल्याने आगामी काही दिवसात उपबाजार समितीच्या आवारात सोयाबीनची आवक लक्षणीय वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांद्वारे व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यावर्षी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली, तालुक्यात सुमारे साडेचारशे मिनी पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस शेतकऱ्यांना विशेष पसंत आला आणि म्हणून खरीप हंगामात तालुक्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. या खरीप हंगामात तालुक्यात सुमारे 15 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिवाळीच्या कालावधीत खरीप हंगामातील सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाला, मुहूर्ताचा काळ वगळता प्रारंभी सोयाबीनला मोठा नगण्य दर प्राप्त होत होता. सुरुवातीच्या काळात सोयाबीनला मात्र पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच बाजार भाव मिळत होता. त्यावेळी मिळत असलेला बाजार भाव अत्यल्प असल्याने आणि तेवढ्या भावात उत्पादन खर्च देखील काढणे मुश्कील असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यावेळी मोठा धाडसी निर्णय घेत सोयाबीनची साठवणूक करण्यास पसंती दर्शवली. त्यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील गणित समजून घेतले आणि जेव्हा सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाला तेव्हाच सोयाबीनची विक्री केली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या व्यापारी मुत्सद्देगिरीमुळे सोयाबीनच्या बाजार भावात मध्यंतरी वाढ झाली. ज्या पालखेड उपबाजारात सामान्य दिवसात सोयाबीनच्या हंगामात 500 क्विंटल सोयाबीनची आवक होत असते त्याच बाजारात सोयाबीनला मिळत असलेला भाव अत्यल्प असल्याने मात्र शंभर क्विंटलचीच आवक मध्यंतरी नमूद करण्यात येत होती.
बाजारपेठेतील हे चित्र मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून पुरते बदलले आहे. फेब्रुवारी महिना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णमय पहाट घेऊन आला आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीनचे बाजार भाव दिवसेंदिवस वाढत गेले, आणि आता गुरुवारी पालखेड उपबाजार आवारात सोयाबीनला तब्बल 7 हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर प्राप्त झाला. जगात घडत असलेल्या या घटनांमुळे सोयाबीनचे बाजारभाव बराच काळ याच पद्धतीने स्थिर राहणार असल्याचे चित्र बाजारपेठेत बघायला मिळू शकते. राज्यात उन्हाळी हंगामात सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला आहे, निफाड तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनचा पेरा आहे. सोयाबीनला मिळत असलेला सध्याचा दर जर आगामी काही काळ असाच बनलेला राहिला तर उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकतो.
दोन दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धामुळे सोयाबीन तेलाच्या आयातीत मोठी घट घडून येणार आहे, तसेच प्रमुख सोयाबीन उत्पादक देश ब्राझील आणि अमेरिका येथे दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या एकंदरीत तयार झालेल्या समीकरणामुळे देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय सोयाबीनला मोठी मागणी आली आहे. यामुळेच भारतीय सोयाबीनची निर्यात भारताच्या सहकारी देशात वाढली असून देशांतर्गत देखील सोयाबीनला मागणी आली आहे, यामुळेच सध्या सोयाबीनला चांगला विक्रमी दर प्राप्त होत आहे. म्हणजेच, युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद नाशिकच्या पालखेड उपबाजार समितीच्या आवारात बघायला मिळत आहेत.
Share your comments