नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते, यामुळेच नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार लाखो रुपयांचा खर्च करून आपल्या द्राक्षाच्या बागा जोपासत असतात, गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागा मोठ्या संकटात आल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष जोपासण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे.
लाखो रुपयांचा खर्च करून देखील अनेकदा कवडीमोल दर मिळत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांची आर्थिक कोंडी बघायला मिळते. अनेकदा ऐन काढणीच्या वेळी नैसर्गिक संकटांमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. द्राक्ष पंढरीत मात्र नैसर्गिक संकटामुळे नाही तर सुलतानी संकटामुळे एका द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दिंडोरी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. याच तालुक्यातील मौजे वरखेडा येथील एका द्राक्ष बागायतदाराला तब्बल सात लाख रुपयांचा चुना लागला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. द्राक्ष बागायतदारांनी वनी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा देखील नोंदवला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अर्थात 2021मध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मौजे वरखेडा येथील निवृत्ती कोटकर यांच्या शेतात द्राक्षाची हार्वेस्टिंग सुरु होती. निवृत्ती यांच्या शेतात सुमारे पाच दिवस द्राक्षाचे हार्वेस्टिंग प्रगतीपथावर होती. निवृत्ती यांनी आपल्या शेतात थॉम्पसन या जातीची द्राक्ष लागवड केली आहे, आणि मार्चमध्ये निवृत्ती यांची द्राक्षांची काढणी सुरू होते.
निवृत्ती यांनी पाडवा अग्रो सोल्युशन नामक कंपनीस आपले द्राक्ष विक्री केले होते. त्यांनी या कंपनीत सुमारे 155 क्विंटल द्राक्ष विक्री केले, द्राक्ष 4 हजार 600 रुपये एवढा भाव मिळाला होता. निवृत्ती यांच्या या मालाची एकूण किंमत जवळपास 7 लाख 13 हजार रुपये एवढी बनली होती. मात्र या कंपनीने निवृत्ती यांना आत्तापर्यंत एकच छदाम देखील मारून फेकलेला नाही, निवृत्ती यांची हार्वेस्टिंग पूर्ण होऊन एवढ्या चार-पाच दिवसात एक वर्ष पूर्ण होईल मात्र वारंवार पैशांची मागणी करून देखील या संबंधित कंपनीने निवृत्ती यांना आपल्या शेत मालाचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी शेवटी कंटाळून वनी पोलीस स्थानकात या कंपनीतील जवळपास दहा माणसाविरोधात तक्रार नोंदवली आहे.
आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करीत द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आला असतांना या सुलतानी संकटांमुळे द्राक्ष बागायतदाराचे मोठे नुकसान झाले आहे. या द्राक्षबागायतदाराने आपल्या शेतमालाचा पैसा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली आहे.
Share your comments