कोकणातून गोव्यात मासे निर्यात करणाऱ्या वाहनांवरील निर्बंध उठवावेत

Friday, 23 November 2018 10:13 AM


मुंबई:
कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून गोवा राज्यात निर्यात होणाऱ्या मासे वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार तथा व्यावसायिकांवर वाहतुकीकरिता वातानुकूलित वाहनासंदर्भात परिपत्रक काढून गोवा राज्याने निर्बंध घातले आहेत. यामुळे कोकणातील मत्स्य व्यवसायिकांना व्यावसायिक नुकसान सहन करावे लागत असून, गोवा राज्याने हे निर्बंध त्वरित उठवावे, अशी मागणी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे.

आज मंत्रालयात अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट, यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सिंधुदुर्गचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त अरुण विधळेसहआयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री. पवार, कोकण विभागाचे सहआयुक्त श्री. देसाई उपस्थित होते.

गोव्याला महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने भेट द्यावी. तसेच तेथील आरोग्यमंत्री यांना याबाबतचे निवेदन देऊन सर्व माहिती देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय कायद्यात फक्त तापमान नियंत्रणाची तरतूद आहे, मत्स्य व्यवसायिकांना अडचणीची ठरत असलेली वाहतुकीकरिता वातानुकुलित वाहन वापरण्याची अट तात्पुरती दूर करून इन्स्युलेटेड पेट्यांमधून येणारे मासे गोव्यात येऊ द्यावेत आणि कोकणातील मासे व्यवसायिकांवरील निर्बंध त्वरीत दूर करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात येणार आहे.

गोवा राज्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मत्स्य निर्यात होत असते, यापूर्वी इतर राज्यातून आयात होणाऱ्या माशाच्या नमुन्यामध्ये फार्मोलिन नामक केमिकलचे अधिक प्रमाण आढळून आले, या पार्श्वभूमीवर गोवा जन आरोग्य मंत्रालय यांनी गोव्याच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनेचा भाग म्हणून गोवा राज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून आयात होणाऱ्या मासेवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर एका दुसऱ्या परिपत्रकाद्वारे निर्बंध घातले आहेत. यानुसार अन्नपदार्थाच्या वाहतूक तथा विक्रीकरिता दिला जाणारा परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासना मार्फत द्यावे तसेच मासे वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे वाहन वातानुकुलित असणे बंधनकारक केले आहे.

तथापि, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासना मार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील मत्स्य वाहतूकदारांसाठी विशेष मोहीम राबवून अन्नपदार्थाच्या वाहतूक तथा विक्रीकरिता दिले जाणारे परवाने देण्यात आले. या संदर्भात कोकणातील मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळावा यासाठी सातत्याने श्री. बापट आढावा घेत आहेत.

fish export goa Girish Bapat मत्स्य निर्यात गोवा गिरीश बापट सिंधुदुर्ग रत्नागिरी Sindhudurg ratnagiri
English Summary: remove restrictions on vehicles exporting fish in Goa

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.