1. बातम्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार राज्यात प्रथम

KJ Staff
KJ Staff


औरंगाबाद :
 शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य होते आहे. या योजनांच्या माध्यमातून गाव समृद्ध होण्यास मदत होते. आता लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभही तत्काळ पोहोचतो आहे. ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत केवळ पुरस्कारप्राप्त गावांनी बक्षीस मिळेपर्यंतच कार्य न करता त्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज व्यक्त केली.जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2016-17 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.बागडे बोलत होते. या कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, गावाचे आकर्षण स्वच्छतेवरून ठरते. म्हणून प्रत्येकाने यासाठी धडपड करावी. त्यातून स्वच्छता वाढते, टिकून राहते. अस्वच्छता होणार नाही, याची ती खबरदारी असते. त्याचबरोबर गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन, शौचखड्डे, गांडूळ खत याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. चांगली गावे अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे श्री. बागडे म्हणाले.

स्वच्छता व पाणी पुरवठ्याबाबत बोलताना मंत्री श्री. लोणीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या कार्याचे कौतुकही केले. त्याचबरोबर आता स्वच्छतेची कास धरू, असे आवाहनही केले. महाराष्ट्राने स्वच्छता अभियानांतर्गत देशात प्रशंसनीय कार्य केले आहे. यापुढे तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींचाही गौरव करण्यात येईल. देशात मागील चार वर्षात जवळपास 58 लाख शौचालयांची निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. पाणी पुरवठ्यालाही प्राधान्य देऊन मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वाकांक्षी योजना टंचाईमुक्तीसाठी मोलाची ठरणार असल्याचे मतही श्री.लोणीकर यांनी यावेळी मांडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत ‍मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यातून महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाले. 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या अंलबजावणीसाठी काही मूलभूत बदलाबाबत सांगताना लोणीकर म्हणाले, आता प्रत्येक ग्रापंचायतींच्या उत्कृष्ट प्रभागास (वॉर्ड) दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवल्याने प्रत्येक गावातील कुटुंबांची स्वच्छता वाढेल, काही मूलभूत बदलाने स्वच्छतेची चळवळ व्यापक होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.भापकर, श्री. पवार, डॉ. कराड, श्री. गोयल यांनीही विचार मांडले.

यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव तायडे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपपसचिव व प्रकल्प संचालक अभय महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची उपस्थिती होती.


स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरेबाजार प्रथम
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत देण्यात येणारा 2016-17 चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. 
द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) व शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड)  
तिसरा विभागून (प्रत्येकी साडेसात लाख रुपये) धाटाव (ता. रोहा, जि. रायगड) व राजगड (ता. मुल, जि. चंद्रपूर) यांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी गावात स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती केल्याबद्दल महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा श्री. लोणीकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. अहमदनगर ग्रामसेवक सोशल फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेला पाणंद मुक्तीविषयीचा लघुपट या कार्यक्रमात दाखविण्यात आला, विशेष म्हणजे या लघुपटात सर्व ग्रामसेवकांनीच भूमिका साकारलेली आहे.


विशेष पुरस्कार:
तीन ग्रामपंचायतींना प्रत्येकी 3 लाख रुपये रोख रकमेच्या विशेष पुरस्कारात
पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्र - स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (3 लाख रुपये) अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक)
कुटुंब कल्याण क्षेत्र - स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार देवगाव (ता. अचलपूर जि. अमरावती)
सामाजिक एकता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पांगरखेड (ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांना मिळाला.


विभागस्तरावरील प्रथम, द्वितीय पुरस्कार:
विभागस्तरावर 10 लाख प्रथम तर 8 लाख रुपये रोख असा द्वितीय पुरस्कार देण्यात आला.
औरंगाबाद विभागात प्रथम धामनगाव (ता. शिरुर, जि. लातूर), द्वितीय शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड)
अमरावती विभागात प्रथम पांगरखेड (ता. मेहकर, जि. बुलढाणा), व्दितीय देवगाव (ता. अचलपूर, जि. अमरावती)
नागपूर विभागात प्रथम शिवनी (मो) (ता. लाखणी, जि. भंडारा), द्वितीय राजगड (ता. मुल जि. चंद्रपुर)
नाशिक विभाग प्रथम हिवरेबाजार (ता.जि. नगर), द्वितीय अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक)
पुणे विभाग प्रथम मान्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा), द्वितीय चाकण (ता. खेड, जि. पुणे)
कोकण विभाग प्रथम धाटाव (ता. रोहा जि. रायगड), द्वितीय आंदुर्ले (ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.


स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक अव्वल
नागरिकांचे अभिप्राय नोंदविणे यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे नाशिक, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.तर विभागस्तरावर औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद, अमरावतीतून बुलढाणा, नागपूरमधून चंद्रपूर, कोकण विभागातून रायगड, नाशिक विभागातून अहमदनगर तर पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यांचा श्री. लोणीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिद्धी निबंध व लघुपट स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविण्यात आले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters