राज्यात उन्हाचा जोर वाढत असून राज्यातील अनेक भागातील तापमानाचा पारा हा ४० अंशापर्यंत पोहचला आहे. मंगळवारी अकोला येथील तापमान ४१.४ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली. दरम्यान काही भागात अजून पावसासाठी पोषक हवामान बनत असल्याने राज्यातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वर वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी उन्हाचा पार वाढला आहे.
मालेगाव, जळगाव, सोलापूर, परभणी, बह्मपुरी, येथील तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान ३७ ते ४० अंशाच्या दरम्यान आहे. दरम्यान मंगळवारी राज्यात ढगाळ हवामान असल्याने उकाड्यातही वाढ झाली. सोमवारी सांयकाळी नांदेड जिल्ह्यात पावसासह गारपीट झाली. यामुळे तेथील ज्वारी, गहू, हरभरा, हळद, फळपिके, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात तापमान वाढत असताना देखील पावसाला पोषक हवामान होत आहे. आज पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासादरम्यान चक्राकार वाऱ्यांचा देशातील अनेक भागांवर प्रभाव जाणवणार आहे. केरळ आणि तमिळनाडूतही येत्या २४ तासात साधारण पाऊस पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments