हवामान विभागाने आज विदर्भात आणि कोकणातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर सुर्य कोपला आहे. मंगळवारी सकाळपर्यतच्या २४ तासांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान विदर्भात सक्रिय असलेला दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा काहीसा पूर्वीकडे सरकला आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाला पोषक हवामान आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासह देशातील बर्याच राज्यात धुळीचे वादळे, वादळी वारे आणि गारा यांच्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिणी तामिळनाडू, केरळ, अंतर्गत कर्नाटक, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसतील. हरियाणा व पंजाबसह उत्तर आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागात धुळीयुक्त वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेले कमी दाब क्षेत्र कायम आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात सातत्याने तापमान ४३ अंशाच्या पुढे आहे. परभणी, अकोला, अमरावती, बह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे कमाल तापमान ४४ अशांपेक्षा अधिक असून जळगाव, धुळे, मालेगाव, नांदेड, गोंदिया येथे ४३ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, निफाड, सांगली येथे तापमान चाळीस अंशांच्या खाली आहे, तर कोकणात कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशाच्या दरम्यान आहे.
Share your comments