सांगली जिल्ह्यात 1 ते 4 डिसेंबर या चार दिवसांत मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. जिल्ह्यातील 20 हजार 504 हेक्टरवरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच डाळिंबाचे 85 हेक्टर तर हरभऱ्याचे 377 हेक्टरवरील नुकसान झाले आहे.
एका दिवशी सुमारे 16 तास पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामासह भाजीपाला पिकांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, वाळवा, कडेगाव, पलूस, जत तालुक्यातील सुमारे 384 गावातील पिके बाधित झाली आहेत.
मॉन्सूनोत्तर पाऊसामुळे झालेल्या नुकसानिचे पंचनामे तातडीने करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी पाहणी केली. त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
कृषी विभागाने 15 ते 20 दिवसांत पंचनामे पूर्ण केले. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. शासनाने अहवाल सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. शेतकरी राजा मात्र हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? आता शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करू लागले आहेत.
द्राक्ष पिकाची अशा प्रकारे काळजी घ्यावी
या थंड वातावरणामुळे मण्यामध्ये क्रकिंगची समस्या वाढू शकते. या समस्याचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
थंडीच्या वातावरणात बागेतील जमीन वाफसा स्थितीमध्ये ठेवावी. व पिंक बेरीची समस्या वाढू नये यासाठी तापमान कमी होताच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवाव्यात.
घड पेपरने झाकावेत. थंडी वाढल्यास मण्यांचा आकार वाढण्यात अडचणी येतील.
यावर उपाय म्हणून बेडवर आच्छादन महत्त्वाचे आहे. त्यासोबत मुळे कार्यरत राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात.
Share your comments