![](https://kjmarathi.b-cdn.net/media/4291/soya-and-basamti.jpg)
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने पूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीननंतर आता इराणसह दुसऱ्या देशात पसरलेल्या या व्हायरसमुळे कृषी क्षेत्राला फटका बसताना दिसत आहे. मागील एका महिन्यात तांदूळ, कापूस आणि सोयाबीनच्या किंमतीत १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून होलसेल मार्केटमध्ये कापूस आणि सूताच्या धाग्यांच्या दरात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. बासमती तांदुळाच्या किंमतीत १० टक्के तर सोयाबीनचे दर ५ टक्क्यांनी गडगडले आहेत.
इराणमध्ये २० मार्चपासून नव्या वर्षाचे नौरोज पर्व साजरा केले जाते. त्याचवेळी बासमती तांदूळ आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. या पर्वामुळे शिपमेंटसची संख्या वाढेल अशी आशा होती. निर्यात करण्यासाठी ही वेळ फार महत्त्वाची असते. परंतु याचवेळी पूर्ण व्यापार ठप्प पडला आहे. साधारण ६० हजार टन तांदूळ बंदरांवरती पडून आहे.
याचप्रमाणे सोयाबीनच्या निर्यातीत घसरण आली आहे. मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या किंमती १५ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. भारत दर वर्षाला १५ ते २० लाख टन सोयाबीन मील निर्यात करत असतो. यातील २५ टक्के भाग हा इराण खरेदी करत असतो. परिस्थित सुधारणा नाही झाली तर सोयाबीनचे दर ५ टक्क्यांनी खाली येतील. दरम्यान सोयाबीनचा भाव सध्या ३९ हजार रुपये प्रति क्किंटलच्या आसपास आहे.
Share your comments