1. बातम्या

कापूस पिकातील शेंदरी बोंड अळीचे व्यवस्थापन

KJ Staff
KJ Staff


औरंगाबाद: शेंदरी बोंड अळीचे पतंग सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री. रवींद्र पाटील रा. जरंडी. तालुका सोयगाव. व श्री. अविनाश कोकरे गंगापूर. जि. औरंगाबाद यांच्या शेतातील असून 4 ते 5 शेतकऱ्यांच्या प्रतिसादावरून असे लक्षात येते की, सद्यस्थितीत पोळा अमावस्येनंतर मोठ्या प्रमाणात पतंग कामगंध सापळयामध्ये येत असून अंडी घालण्याचे कामकाज चालू असावे. कारण या किडीचे प्रमाण सप्टेंबर नंतरच वाढते. कामगंध सापळयामध्ये आतापर्यंत पतंग येत नव्हते म्हणून बऱ्याचदा शेतकरी दुर्लक्ष करतो.

वरील प्रमाणे शेतकऱ्यांकडील अनुभव पाहता सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या कामगंध सापळ्यातील पतंगच्या संख्येवर सनियंत्रण ठेवून प्रत्येक दिवशी आठ पतंग एका कामगंध सापळ्यात सतत तीन दिवस येत असल्यास तात्काळ पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी. उघडी पिवळे, लाल फुले व सुकलेली लाल फुले व तयार झालेल्या गाठी तसेच सद्यस्थितीत झाडावर असलेली पाते व फुले यावर तात्काळ फवारणी करून ती धुवून काढावीत. तसेच कामगंध सापळ्यात अडकलेले पतंग चुरगळून किंवा क्लोरपायरिफॉस किंवा रॉकेलच्या पाण्यात मिसळून नष्ट करावे म्हणजे एका पतंग पासून पुढे शंभर ते दोनशे अंडी घालून वाढणारी किडीची लोक संख्या तात्काळ थांबविता येईल व हंगामात कीड मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

अन्यथा आताचा जीवनचक्र आपल्या दुर्लक्षामुळे पुर्ण झाल्यास पुढे किडीची संख्या प्रचंड म्हणजे 200 पट अचानक वाढुन जिल्ह्यातसर्वानी आता पर्यंत केलेले प्रयत्न विफल ठरतील. प्रत्येक गावात अशा पद्धतीचे कामगंधसापळे लावून मासट्रपींग करून पतंग मारल्यास हंगामात प्रचंड मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक बोंडआळी पासून नुकसान होण्यापासून थांबवता येईल. कामगंध सापळयातील ल्युर 45 ते 60 दिवसा नंतर बदलणे अपेक्षित असते जर कामगंधल्युर बसवुन वरिल प्रमाणे दिवस झाले असतील तर तात्काळ ल्युर बदलावी.

घरच्याघरी तयार करा कामगंध सापळा:

 • रिकामी 1 लिटरची पाणी बॉटल घ्या. 
 • बॉटलचे वरील भागात इंग्रजी U अक्षर (विठ्ठलाचे गंधा सारखा) कटर किंवा चाकूच्या सहाय्याने शेंदरी बोंडअळीचा पतंग जाईल येवढी छोटीशी खिडकी बॉटलच्या चारी दिशानी तयार करावी. लक्षात घ्या U आकाराचा काप घेताना वरील भाग कापायचा नाही. तो मधे फोल्ड करुन ढकलून द्यावयाचा आहे. म्हणजे तो लटकत राहिला पाहिजे व पडदी सारखे काम करेल.
 • बॉटल वरिल झाकणास छोटेसे छिद्र पाडून बांधणीचा तार (बांध कामात वापरली जाणारी तार) त्यातून ओवुन आतील भागात आकडा तयार करुन त्यास खिडकी जवळ ल्युर बसवावी. झाकण बॉटलला घट्ट लाऊन तार झाकणाबाहेर काढून रोवलेल्या काठीस बांधून घ्यावी.
 • बॉटल मधे खाली 1 सेमी पाणी ठेवावे. म्हणजे पतंग अडकल्यावर पाण्यावर बसुन मरुन जातील.


घरच्याघरी तयार करा निंबोळी अर्क:

पाच किलो निंबोळी बाजारातून विकत घ्यावी. व तिचे मिक्सर मधून जाडेभरडे पावडर तयार करून 24 तास 10 लिटरपाण्यामध्ये भिजवून ठेवावे त्यानंतर वस्त्रगाळ करून हे 10 लिटर पाणी 90 लिटर साध्या पाण्यामध्ये मिसळावे म्हणजे शंभर लिटर निंबोळी अर्क घरच्याघरी तयार होतो. घरी तयार केलेलया निंबोळी अर्काची पाने फुले असताना दर 15 दिवसांंनी फवारणी घ्यावी.

फायदे: 

 • निंबोळी अर्क रिपेलंट म्हणून काम करतो. अर्क फवारणी केलेलया शेतात पतंग उग्र वासामुळे अंडीच घालणार नाही. त्यामूळे अळी निर्माण होणार नाही व किडीची संख्या मर्यादित राहिल.
 • अळी अंड्याबाहेर पडून अर्काशी संपर्क आल्यावर आळीस अपंगत्व येते व अळी मरते.
 • किडीमधे नपुंसकत्व आणुन पुढील लोकसंख्या कमी करते.
 • बोंड अळी सोबतच रसशोषण करणाऱ्या किडी मावा, तुडतूडे, फुलकिडे, पांढरीमाशी यांचेही नियंत्रण करते.

सद्यस्थितीत करावयाची कामे:

 1. सद्यस्थितीत शेतामध्ये कामगंध सापळे लावून मोठ्या प्रमाणात पतंग पकडून मारून टाकावेत. 
 2. कामगंध सापळामध्ये दररोज आठ पतंग तीन दिवस सापडल्यास किंवा रॅन्डम पद्धतीने 20 फुलांपैकी दोन फुलांमध्ये बोंड अळीचे प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
 3. सद्यस्थितीत शेतात दोन दिवसाआड एक फेरी मारून बंद असलेल्या कळ्या म्हणजेच डोमकळ्या ज्यामध्ये गुलाबी बोंड अळी असते त्या तोडून नष्ट कराव्यात.
 4. उघडी पिवळी फुले व लालफुले तसेच लाल फुले सुकून छोटी गाठ खाली तयार होत असताना निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक 15 दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास हे फुल निरोगी स्वरूपात बोंडामध्ये परावर्तित होण्यास मदत होईल.
 5. दर अमावस्यच्या 2 ते 5 व्या दिवसापर्यंत आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार निंबोळी अर्का सोबत खालील पैकी एक कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. क्वीनॉल्फॉस किंवा क्लोरोपायरीफॉस किंवा प्रोपेनोफॉस किंवा इमामेक्टीनबेन्झोएट 20 मिली/10 लिटर किंवा थायोडीकार्ब 20 ग्रॅम/10 ली.

वरील प्रमाणे सध्यस्थितीत दक्ष राहुन उपाययोजना करण्याबाबतचे आवाहन उपाध्यक्ष जिल्हा परिषद औरंगाबाद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्तीकपणे करण्यात येत आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters