1. बातम्या

देशभरात जलशक्ती अभियान अंतर्गत एकाच महिन्यात साडेतीन लाखांहून अधिक जलसंधारण उपाययोजना

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये, केंद्र शासनातर्फे जलशक्ती अभियानची (जेएसए) सुरूवात झाली असून या अंतर्गत 256 जिल्ह्यात 3.5 लाखांहून अधिक जलसंधारणाच्या उपाययोजना केल्या आहेत. यापैकी 1.54 लाख योजना जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याची साठवण यासंबंधीच्या आहेत तर पारंपारिक जलसोत्राच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित 20,000 आहेत, 65,000 जल पूनर्वापर आणि पुनर्भरण संरचने संदर्भात आहेत आणि 1.23 लाख पाणलोट विकास प्रकल्प आहेत. अंदाजे 2.64 कोटी लोकांनी या अभियानात सहभाग नोंदवून याला जनआंदोलन यापूर्वीच बनवले आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुमारे 4.25 कोटी वृक्षारोपण करण्यात आले आहे. जलशक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या यशासंदर्भात नवी दिल्लीतील कॅबिनेट सचिवांनी आढावा घेतला.

या आढावा बैठकीच्या अध्यक्षपदी असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव श्री. प्रदीपकुमार सिन्हा यांनी अभियानात सहभागी नोडल अधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांची व बांधिलकीची प्रशंसा केली व महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप व पुढाकारांद्वारे संबधित जिल्ह्यांबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहनही दिले. ते म्हणाले, “जेएसएने देशात निश्चितच एक चर्चा निर्माण केली आहे आणि येणाऱ्या काही वर्षांत हे अभियान चांगली कामगिरी करेल. आमचे उद्दीष्ट हे तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे सुनिश्चित करणे आहे.’’

डीडीडब्ल्यूएसचे सचिव श्री. परमेश्वरन अय्यर यांनी सांगितले की जेएसएमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे, भूजल साठवण क्षमता वाढली आहे, शेतजमिनींमध्ये मातीची ओलावा टिकला असून वनस्पतींचेही प्रमाण वाढले आहे. जेएसए केंद्र आणि राज्याच्या विविध मंत्रालयांच्या सहकार्यामधून होत असलेला हा प्रयत्न मुख्यत: जलसंचयनाची मोहीम आहे जिने गेल्या एका महिन्यात अभूतपूर्व गती मिळविली आहे. केंद्र सरकारच्या सुमारे 1,300 अधिकाऱ्यांबरोबर राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांना 3 क्षेत्र भेटी अनिर्वाय करत त्यांच्या संयुक्तिक सहभागाने ही मोहीम यशस्वीरित्या सुरू झाली आहे.     

पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव यांच्यासोबत कार्यशाळा

जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या व यशस्वी हस्तक्षेप, नवकल्पना आणि कार्यनीती राबविणार्‍या नामांकित स्वयंसेवी संस्थांची सादरीकरणेही या कार्यशाळेमध्ये झालीत. प्रख्यात अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे संस्थापक श्री. आमिर खान यांनी फाउंडेशनच्या गतिशील प्रयत्नांमुळे संबंधित खेड्यांमधील जीवनात परिवर्तन झालेल्या महाराष्ट्राच्या तळागाळातील यशकथांविषयी प्रोत्साहित करणारे चित्रपट दाखवले. पाणी बचतीचे महत्त्व, त्यासाठी प्रभावी मार्ग व तंत्रे तसेच पुढाकार घेण्यास प्रमुख भूमिका घेण्यासंदर्भात ग्रामीण स्तरावरील लोकांना शिक्षित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

पॅन हिमालय ग्रासरूट डेव्हलपमेन्ट फाउंडेशन, उत्तराखंडचे कार्यकारी संचालक श्री. पॉल यांनी, भारताच्या पर्वतीय राज्यांत जलसंवर्धनात महिलांनी कशी महत्वाची भूमिका बजावली याविषयी विवेचन केले. उत्तर-पूर्व भारतात कार्यरत ‘अरण्यक’ या स्वयंसेवी संस्थेने “डोंग बूंध प्रणाली” चे (पारंपारिक जलसंधारण आणि व्यवस्थापन प्रणाली जे पारंपारिक पद्धतीने पेयजल व सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करते) महत्त्व अधोरेखित केले. बंगलोर स्थित ‘अर्घ्यम’ संस्थेच्या प्रतिनिधींनी स्थानिकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करणे, स्थानिक जलस्रोत व्यवस्थापित करण्यासाठी त्यांचा सहभाग आणि मालकी सुनिश्चित करणे आणि कार्यक्षम जलसंधारणाचे उपाय सुनिश्चित करण्याचे मार्ग म्हणून अविरतपणे काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आढावा बैठक-वजा-कार्यशाळेत त्यांच्या विभागांशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित केंद्रीय सचिव उपस्थित होते. इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सल्लागार, श्री. टी. पी. सिंह यांनी जल संचयात स्पेस व जिओ माहिती (3 डी) च्या वापराविषयी सादरीकरण केले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters