1. बातम्या

संत्र्याचे भाव कोसळल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक चिंतेत

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


संत्र्याला भाव नसल्याने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आल्याने  २०० रुपये कॅरेटने संत्री विकली जात  आहे.  यावर्षी अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्री बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात फळगळ झाली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्रा फळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने मोर्शी आणि वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्री बागा आहेत. टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील संत्र्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्री बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. त्यामुळे संत्री उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.

मध्यंतरी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. सध्या संत्र्याला १२०० ते १५००  रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.  यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters