नवी मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील दहा हजारपेक्षा जास्त समुदाय संशोधन व्यक्ती/महिलांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. ही किमया महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) यांनी केली आहे आणि असे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. लॉकडाऊनच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून प्रशिक्षण देण्याची संकल्पना एनआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी मांडली, आणि ती यशस्वी देखील झाली.
राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात. गावोगावी, खेडोपाडयांमध्ये असलेल्या स्वयंसहायता गटांमधील महिलांना या योजनांची माहिती मिळावी. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) हे प्रयत्नशील आहे. नवी मुंबई येथील ग्राम विकास भवन येथे यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. यापूर्वी विविध जिल्ह्यांमधून सुमारे पन्नास प्रतिनिधींना बोलवून त्यांना योजनांबाबत प्रशिक्षण दिले जात होते व या प्रशिक्षित प्रतिनिधींद्वारे संपूर्ण राज्यातील स्वयंसहायता गटातील महिलांना प्रशिक्षित केले जात होते. कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात शासनाने जमावबंदी लागू केली असल्यामुळे अशाप्रकारचे प्रशिक्षण शिबिरे घेणे बंद झाले होते. यावर मार्ग काढत ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
स्वयंसहायता गटात काम करणाऱ्या महिलांना कृषि सखी प्रशिक्षण, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ, क्षमता वृध्दीसाठी विविध विकास कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे राबविण्यात आले आहेत. महिलांनी त्यांच्या घरात बसून स्मार्ट फोनद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेतला. संपूर्ण भारतात कोविड सारख्या आजाराने लॉकडाऊन असतांना महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे की, त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण दररोज चार तास सुरु होते. या प्रशिक्षणादरम्यान चर्चासत्र, पीपीटी सादरीकरण, छोटेखानी फिल्म आणि सहभागी महिलांची प्रश्नोत्तरे यांचा समावेश होता. गावपातळीवरील सहा वेगवेगळया प्रशिक्षणात ३४ जिल्हे सहभागी झाले होते. अडीच हजारांपेक्षा जास्त अधिकारी/कर्मचारी आणि दहा हजारापेक्षा जास्त समुदाय संसाधन व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दि. २७ एप्रिल ते २ मे 2020 या कालावधीत हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती श्रीमती आर. विमला यांनी दिली.
Share your comments