कोरोनामुळे राज्याअंतर्गत आणि परराज्यातील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातील बाजारपेठांमध्ये नेऊ शकत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनचे नाव स्पेशल हॉर्टिकल्चर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेमधून शेतमाल परराज्यात पाठवता येणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना फटका बसला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ३५ टक्के कांदा उत्पादित होतो. आता कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित होणार आहे. त्याउलट उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या कांद्याची टंचाई जाणवत आहे. जर यावेळी महाराष्ट्रातील कांदा परराज्यातील बाजारात गेला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आता स्पेशल हॉर्टिकल्चर ट्रेनच्या माध्यमातून हा कांदा पंजाब, दिल्ली, बिहार तसेच दक्षिण व पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी पणन मंडळ आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्यावतीने पुढाकार घेतला आहे. परराज्यात कांदा विक्री नेण्यासाठी १,४०० टन क्षमता असलेली ४० बोगीची स्वतंत्र रेक किंवा ८ ते ९ बोगी सुद्धा वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रेनच्या नोंदणीसाठी इच्छुक शेतकरी, उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी ०११-४१२२२५१८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा. दरम्यान शेतमाल व अत्यावश्यक वाहतुकीसाठी ५८ रेल्वेमार्गांवर १०९ पार्सल ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. यातून राज्यातील शेतमाल व अत्यावश्यक वस्तू इतर राज्यांमध्ये पाठवता येणार आहे.
यासह डाहाणूमध्येही रेल्वेमार्फत शेतमालाची ने -आण होत आहे. यासाठी भारतीय रेल्वेने तालुक्यातील तीन स्थानकांवर मालवाहू गाड्यांना थांबा देऊन शेतमाल व्यापाराचा मार्ग मोकळा केला आहे. जिल्ह्यातील शेतीमाल उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठेत पाठवता यावा म्हणून कृषी विभागाच्या प्रयत्नाने भारतीय रेल्वेने संधी उपलब्ध केली. त्यानुसार शुक्रवारपासून पालघरप्रमाणेच तालुक्यातील वाणगाव, डहाणू रोड आणि घोलवड या तीन स्थानकांमध्ये या मालवाहू गाडीला थांबा देण्याची तयारी रेल्वेने दाखवली.
या तालुक्यात चिकू, नारळ, ढोबळी तसेच तिखट मिरची आणि अन्य भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. प्रतिदिन दिल्ली फळबाजारात येथून ३० ते ३५ ट्रक चिकू फळाची आणि मिरचीसह अन्य भाजीपाल्याचे सुमारे ५० ट्रक पाठवले जातात. दरम्यान शेतमाल निर्यातीला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला असला, तरी त्याला स्थानिक व्यापाऱ्यांकडून लाल सिग्नल मिळाल्याने कृषी विभागाच्या प्रयत्नानंतरही तालुक्यात या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवता आलेली नाही.
Share your comments