1. बातम्या

Kanda Lagwad : खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामासाठी कांद्याचे वाण; जाणून घ्या सविस्तर माहिती

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे कांदा लागवडीसाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ आणि उत्पादन हे वापरलेल्या बियाण्यावरच अवलंबून असते. कांदयाचे पिकाचे दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, खात्रीशीर बियाण्याची निवड तसेच रोपवाटीका व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. कांद्याचे वाण निवडताना रोग व कीड प्रतिकारक्षम वाण निवडावेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Onion News

Onion News

डॉ.आदिनाथ ताकटे

कांदा हे महाराष्ट्रातील भाजीपाल्याचे महत्वाचे नगदी पीक असून त्यावर सर्वसामान्य शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक घडी अवलंबून आहे. गरीब-श्रीमंतांच्या आहारात कांद्याचा वापर नित्याचा असल्यामुळे कांद्याला वर्षभर मागणी असते. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.

देशातील एकूण उत्पादनापैकी ४० टक्के कांदा उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात कांद्याची लागवड ही खरीप, रांगडा आणि रब्बी अशी तीनही हंगामात होते. त्यापैकी ६० टक्क्याहून अधिक क्षेत्र हे रब्बी हंगामात,तर ४० टक्के लागवड ही खरीप/रांगडा हंगामात होते. या हंगामाकरिता महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी तसेच कांदा-लसून संशोधन संचनालयाद्वारे, (राजगुरुनगर,पुणे ) कांद्याच्या विविध जाती निर्माण केल्या आहेत.

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे कांदा लागवडीसाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ आणि उत्पादन हे वापरलेल्या बियाण्यावरच अवलंबून असते. कांदयाचे पिकाचे दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, खात्रीशीर बियाण्याची निवड तसेच रोपवाटीका व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. कांद्याचे वाण निवडताना रोग व कीड प्रतिकारक्षम वाण निवडावेत. मानेची जाडी, पक्वता कालावधी आणि रंग इत्यादी निकष लक्षात घ्यावेत. बियाणे खरेदी करताना शुद्ध ,शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, चालू वर्षाचे बियाणे लागवडीसाठी वापरावे. बियाण्याची खरेदी अधिकृत स्रोताकडून करण्यात यावी.

कांद्याचे हेक्टरी ५ ते ७ किलो बियाणे पुरेसे होते. ते नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून घ्यावे. कांद्याच्या बियाण्याची उगवणशक्ती केवळ एक वर्ष राहते. त्यामुळे नेहमी ताजे बियाणे घेणे आवश्यक ठरते. बऱ्याच वेळा कांदा पिकात डेंगळे येतात आणि अनेक शेतकरी त्याचेच बी धरून लावतात. अशा बियाण्यामुळे उत्पादन कमी येते आणि कांद्याची प्रतही चांगली राहत नाही. केवळ चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून तयार केलेले बियाणे वापरावे. शक्यतो शासनाने अधिकृत केलेल्या बियाणे विक्री केंद्रातून किंवा कृषि विद्यापीठातून बियाण्याची खरेदी करावी. हंगामनिहाय जातीची निवड करून त्या जातीचेच बियाणे खरेदी करावे.

कांद्याचे विविध वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-
बसवंत- ७८०
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कांदा संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक वाणातून १९८६ मध्ये विकसित वाण
कांदे गोलाकार असून शेंड्याकडे थोडे निमुळते
रंग आकर्षक गडद लाल
काढणीनंतर ३-४ महिने रंग चांगला टिकून राहतो.
डेंगळे तसेच जोडकांद्याचे प्रमाण खूपच कमी
बाजारात या जातीच्या कांद्यांना चांगला उठाव
लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत कांदा काढणीला येतो.
खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात ही जात फार लोकप्रिय
सरासरी उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन

एन-५३
नाशिक येथील स्थानिक वाणातून ही जात विकसित
प्रसारण वर्ष १९६०
कांदे गोलाकार व चपटे
जांभळट लाल रंग आणि चवीने तिखट
खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात तसेच उत्तर प्रदेशात ही जात फार लोकप्रिय
सरासरी उत्पन्न हेक्टरी २५ ते ३० टन

अर्का कल्याण
भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था,बंगलोर येथून कळवण भागातील स्थानिक वाणातून विकसित
कांदे गोलाकार,रंगाने गर्दलाल आणि चवीने तिखट
१०० ते ११० दिवसांत काढणीस येतात
सरासरी उत्पन्न २५ ते ३० टन /हेक्टरी

अॅग्री फाऊंड डार्क रेड
नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी संस्थेने ही जात स्थानिक वाणातून विकसित
प्रसारण वर्ष १९८७
खरीप हंगामासाठी योग्य,
कांदे गर्द लाल, मध्य तिखट, गोलाकार
लागवडीपासून ९० ते १०० दिवसांत कांदा तयार
सरासरी उत्पन्न हेक्टरी २० ते २७ टन

अॅग्री फाऊंड लाईट रेड
नाशिक राष्ट्रीय बागवानी संस्था, नाशिक येथून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विकसित
कांदे गोल, मध्यम ते मोठे व फिक्कट लाल
चव तिखट,विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण १३ टक्के
डेंगळयाचे प्रमाण कमी
साठवणुकीस चांगली
लागवडीपासून १२५ ते १३० दिवसांत कांदा तयार
सरासरी उत्पन्न हेक्टरी ३० -३५ टन

अर्का निकेतन
भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था,बंगलोर येथून नाशिक भागातील वाणातून विकसित
कांदे गोलाकार,रंगाने गुलाबी, बारीक मानेचे, चवीला तिखट
साठवण क्षमता ५-६ महिने
सरासरी उत्पन्न हेक्टरी २५-३० टन

फुले समर्थ
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ही जात खरीप आणि रांगडा हंगामासाठी स्थानिक वाणातून विकसित
कांदे उभट गोल असून चमकदार गर्द लाल रंगाचे
कांद्यांची माण बारीक, पातीची वाढ मर्यादित राहून कांदा पोसण्याचा वेग जादा राहतो
हा वाण तीन ते चार आठवडे आधी तयार होतो.
खरीप हंगामात लागवडीनंतर ७५ ते ८५ दिवसांत, रांगडा हंगामात ८५ ते १०० दिवसांत तयार
कांदा लवकर तयार होतो, तसेच कांद्याला पक्वता येताच नैसर्गिकपणे संपूर्ण पात पडते.
त्यामुळे २-३ पाण्याच्या पाळ्यांची बचत होते.
कांदे लागवडीपासून साधारणतः ८० ते ९० दिवसांत तयार होतात
खरीपात सरासरी हेक्टरी २५ टन आणि रांगडा हंगामात हेक्टरी ३० ते ३५ टन उत्पन्न
साठवणक्षमता साधारणपणे २ ते ३ महिने

एन 2-4-1
पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने ही जात निवड पद्धतीने विकसित
रब्बी हंगामासाठी शिफारस
कांदे गोलाकार मध्यम ते मोठे
रंग विटकरी असून चव तिखट
साठवण क्षमता पाच ते सहा महिने
जांभळा करपा या रोगाला व फुलकिड्यांना सहनशील
लागवडीनंतर कांदे १२० दिवसांने काढणीला येतात
सरासरी उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ टन

फुले सफेद
रांगडा तसेच रब्बी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १९९४ मध्ये विकसित
कांदे चमकदार रंगाचे मध्यम गोल
विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण १३ ते १४ टक्के
निर्जलीकरण करून कांद्याच्या चकत्या तसेच पावडर तयार करण्यासाठी उत्तम
साठवण क्षमता २ ते ३ महिने
सरासरी हेक्टरी उत्पन्न २०- २५ टन

फुले सुवर्णा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी १९९७ साली विकसीत
खरीप ,रब्बी आणि रांगडा हंगामात साठी शिफारस
कांदे पिवळ्या किंचीत विटकरी रंगाचे, गोलाकार, घट्ट, मध्यम तिखट
निर्यातीस व साठवणीस योग्य,
लागवडीपासून ११० दिवसात कांदा तयार
सरासरी हेक्टरी उत्पन्न २३ ते २४ टन

कांदा - लसून संशोधन संचनालयाद्वारे,(राजगुरुनगर,पुणे )विकसित कांद्याच्या जाती
भीमा राज
गुजरात, महाराष्ट् आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खरीप व रांगडा हंगामासाठी प्रसारित
हरियाना, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये रब्बी हंगामासाठी उपयुक्त
खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणीस
रांगडा व रब्बी हंगामामध्ये लागवडीनंतर ११५ ते १२० दिवसांत काढणीस
सरासरी उत्पादन: खरीप हंगाम: २४ ते २६ टन/हेक्टर,
रांगडा हंगाम: ४० ते ४५ टन/हेक्टर
रबी हंगाम: २५ ते ३० टन/हेक्टर
साठवणुकीत ही जात रांगडा हंगामामध्ये ४ महिने
तर रब्बी हंगामामध्ये २-३ महिने टिकते.
फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील

भीमा रेड
पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत खरीपासाठी प्रसारित
गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रांगडा हंगामासाठी प्रसारित
तसेच मध्यप्रदेश आणि महराष्ट्र या राज्यांमध्ये रब्बी हंगामासाठी प्रसारित
खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०५ ते ११० दिवसांत काढणीस
तसेच रांगडा व रब्बी हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस
सरासरी उत्पादन :खरीप हंगाम: १९ ते २१ टन/हेक्टर
रांगडा हंगाम: ४५ ते ५० टन/हेक्टर
रब्बी हंगाम: ३० ते ३२ टन/हेक्टर
साठवण क्षमता खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त १ ते १.५ महिना
तसेच रांगडा मध्ये ४ महिने व रब्बी हंगामामध्ये ३ महिन्यांपर्यंत
फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील

भीमा डार्क रेड
जम्मू, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडीशी, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे.
लागवडीनंतर खरीप हंगामामध्ये १०० ते ११० दिवसांत काढणीस
गर्द लाल रंगाचे कांदे
फुलकिडे व काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांसाठी सहनशील आहे.
सरासरी उत्पादन २२ ते २४ टन/हेक्टर
साठवणुकीत ही जात दोन महिन्यांपर्यंत टिकते.

भीमा सुपर
जम्मू, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडीशी, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत खरीप हंगामासाठी
गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत रांगडा हंगामासाठीसुध्दा उपयुक्त
खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत,
तसेच रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस
सरासरी उत्पादन खरीप हंगामामध्ये २० ते २२ टन/हेक्टर.
तसेच रांगडा हंगामामध्ये ४० ते ४५ टन/हेक्टर
साठवण क्षमता खरीप हंगामामध्ये १ ते १.५ महिना तसेच
रांगडा हंगामामध्ये ३ महिन्यांपर्यंत
जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे
त्यामुळे ही जात कांद्याचे निर्जलीकरण करून तळेलेले काप (रिंग)
तसेच सलाड बनवण्यासाठी उत्तम
फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणत सहनशील

भीमा किरण
पंजाब,हरियाणा,दिल्ली,उत्तरप्रदेश,बिहार,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रब्बी हंगामासाठी प्रसारित
लागवडीनंतर १२५ ते १३५ दिवसांत काढणीस
सरासरी उत्पादन २८ ते ३२ टन/हेक्टर
साठवण क्षमता ५ ते ६ महिने.
बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणत सहनशील

भीमा शक्ती
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, ओडीशा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत रब्बी हंगामासाठी प्रसारित
महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत रांगडा हंगामासाठी प्रसारित
लागवडीनंतर रांगडा व रब्बी हंगामामध्ये १२५ ते १३५ दिवसांत काढणीस
सरासरी उत्पादन रांगडा हंगामामध्ये ३५ ते ४० टन/हेक्टर
रब्बी हंगामामध्ये २८ ते ३० टन/हेक्टर.
साठवण क्षमता ५ ते ६ महिने.
फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

कांदा रोपवाटिका
रब्बी कांदा लागवडीकरिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रोपवाटिका करावी.
मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण काढून टाकावेत.अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
गादीवाफे १०-१५ से.मी. उंच व १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत.
तणांच्या नियंत्रणासाठी वाफ्यांवर पेंडीमिथॅलिन २ मिली लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
एक हेक्‍टर क्षेत्रात रोप उपलब्धतेसाठी पाच गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी होते. त्यासाठी ५ ते ७ किलो बियाणे पुरेसे होते.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यावर २ ग्रॅम कार्बेन्डॅझिमची प्रक्रिया करावी.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक १२५० ग्रॅम प्रति हेक्‍टर याप्रमाणे वापरावे.
पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४:१:१ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात खते द्यावीत
कांदा बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
रोपवाटिका पेरणीनंतर १५ ते २० दिवसानंतर मेटॅलॅक्झील + मॅंकोझेब २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात फवारणी केल्यास मर रोगाचे नियंत्रण होते.
पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करावी त्यानंतर नत्र २ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.
काळा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब १ ग्रॅम, जांभळा व तपकिरी करपासाठी ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिड्यांचे नियंत्रणासाठी फिप्रोनील १ मिली प्रती लिटर पाणी अथवा प्रोफानोफोस १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अशा रीतीने रोपवाटिकेचे व्यवस्थापन करावे.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृदशास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो.९४०४०३२३८९

English Summary: Onion varieties for Kharif Rangda and Rabbi seasons Know the detailed information Published on: 01 November 2023, 11:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters